जनतेला चुकीची माहिती देणे तुम्हाला शोभत नाही; ट्विटमधून अजित पवार गटाचा खोटेपणा उघड

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवार गटाला दिले आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटाला सशर्त घड्याळ चिन्ह वापरायला परवानगी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला विनाशर्त तुतारी चिन्ह दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशानंतर अजित पवार गटाने एक्सवर एक पोस्ट केली आहे. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटावर हल्लाबोल केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मोडतोड करून जनतेला चुकीची माहिती देणे तुम्हाला शोभत नाही, असे सांगत खरी माहिती आम्हीच जनतेसमोर आणतो, अशी पोस्ट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केली आहे.

या पोस्टमध्ये म्हटले आहे की, “सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची मोडतोड करून जनतेला चुकीची माहिती देणं हे आपल्यासारखा स्वयंघोषित स्पष्टवक्तेपणावाल्यांना शोभत नाही…! असो, पण आता आम्हीच खरी माहिती जनतेपुढे आणतो!

काल सर्वोच्च न्यायालयाने विशेष याचिकेवर सुनावणीदरम्यान महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात अजित पवार गटाला घड्याळ चिन्हाच्या वापराबाबत अटी व शर्ती लागू करण्यात आल्या असून मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषेतील वृत्तपत्रांव्दारे जाहिर नोटीस प्रसारित करण्याचे निर्देश दिले आहेत. ज्यामध्ये घड्याळ चिन्हासोबत “घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे!” असे नमूद करण्यात येईल!

दुस-या टप्प्यात अटी व शर्तींचे उल्लंघन होऊ नये यासाठी सर्वोच्च न्यायालयाने असे सांगितले आहे की, बॅनर्स, पोस्टर्स, व्हिडीओ किंवा अन्य कुठल्याही ठिकाणी जिथे जिथे घड्याळ चिन्हाचा वापर करण्यात येईल त्या त्या ठिकाणी “घड्याळ चिन्ह देण्यासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयासमोर प्रलंबित आहे!” असे नमूद करावे. असा खणखणीत निर्देशच सर्वोच्च न्यायालयाकडून अजित पवार गटाला देण्यात आला आहे.

परंतु आपण मात्र सदर ट्वीटव्दारे खोटी माहिती देऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाचाच अवमान केला आहे. खरी माहिती लपवून खोटं सांगत सर्वोच्च न्यायालयाने तुमच्यावर घातलेल्या अटी व शर्ती झाकण्याचा खटाटोप केलाच आहे तर, निर्देशांच्या अवमानाबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडून होणा-या संभाव्य कारवाईलाही सामोरं जा म्हणजे झालं!!!

आणि हो… गेल्यावेळेसच्या ट्वीटप्रमाणे हे देखील ट्वीट डिलीट करू नका बरं… त्यामुळे किमान आताची तरी चूक मान्य करून न्यायालयाच्या अवमानाबद्दल आणि जनतेला खोटी माहिती दिल्याबद्दल जाहीर माफी मागा!!! अशी पोस्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेअजित पवार गटाने एक्सवर शेअर केलेला एक फोटो शेअर केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अजित पवार गटाचा खोटेपणा उघड केला आहे.तसेच न्यायालयच्या आदेशाची माहिती जनतेला दिली आहे. त्यामुळे अजित पवार गटाचा खोटेपणा पुन्हा जनतेसमोर आला आहे.