मी उद्धव ठाकरेंचाच शिवसैनिक, शिवसेनेचाच प्रचार करणार; अंबादास दानवे यांची भूमिका

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा एक मोठा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात काही दिवसांपासून सुरू होत्या. तसेच भाजपच्या काही नेत्यांनी अंबादास दानवे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले होते. लोकसभेसाठी इच्छुक असतानाही त्यांना तिकीट मिळाले नसल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, अंबादास दानवे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत स्वतःची भूमिका स्पष्ट केली आहे.

अनेक प्रसारमाध्यमांवर मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सोडणार असल्याची चर्चा आहे. काही प्रसारमाध्यमे छातीठेकपणे सकाळी 10 वाजता माझा दुसऱ्या पक्षात प्रवेश होणार असल्याचे सांगत होते. मात्र, आपण ते खोटे ठरवले आहे. मी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा शिवसैनिक असून शिवसेनेसाठीच काम करणार आहे, असे दानवे यांनी स्पष्ट केले. तसेच मी शिवसेना सोडणार असल्याच्या पसरवण्यात येणाऱ्या बातम्या अफवा असल्याचेही त्यांनी सांगितले. ज्यांनी खोट्या बातम्या चालवल्या त्यांच्यावर कारवाईची मागणी करणार, कायदेशीर कारवाई केली जाईल. मी शिवसेनेचा आहे. मला गट प्रमुख पदापासून विरोधी पक्ष नेता झालो आहे, त्यामुळे निवडणूक येतात-जातात, पण मी जाणार नाही. चॅनेलच्या टीआरपीसाठी काहीही चालवू नका, असा इशारा दानवेंनी यावेळी प्रसारमाध्यमांना दिला आहे.

मी कायम शिवसेनेतच राहणार असून दुसऱ्या कोणत्याही पक्षात प्रवेश करणार नाही. माझी कोणाशीही कसलीही चर्चा झालेली नाही. पदे येत असतात, पदे जात असतात. त्यामुळे आपण पदासाठी काम करत नाही. मी बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आहे. भाजप मुद्दाम अशा खोट्या बातम्या पसरवत असल्याचा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.

मी निष्ठेने काम करणारा शिवसैनिक आहे. मला पक्ष सोडायचा असता तर याआधीच सोडला असता. मी दुसऱ्या पक्षात प्रवेश करणार असल्याच्या बातम्या म्हणजे अफवा आहेत. भाजपकडून मुद्दाम अशा खोट्या बातम्या पसरवण्यात येत आहेत. लोकसभेसाठी आपण इच्छुक होतो, त्यात काय अयोग्य आहे. अनेकजण इच्छुक असतात. त्यातील एकाची उमेदवार म्हणून निवड होते. त्यात नाराजीचा प्रश्नच येत नाही. आपण तीस वर्षापासून शिवसेनेचे काम करत आहे. आताही शिवसेनेचेच काम करत आहे. आता मी प्रचारात उतरणार आहे. मी शिवसेनेचाच प्रचार करणार आहे. माझ नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आहे. त्यामुळे पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडणार असल्याचेही दानवे यांनी सांगितले.