साहित्य जगत – आठवण

>> रविप्रकाश कुलकर्णी

आठवणीची पण आठवण करावी लागते का? तशी आठवण मनात, काना कोपऱ्यात, इथे तिथे असतेच. व्यक्त अव्यक्त. तरी सुद्धा ती आठवणच असते ना … तर कधी कधी कोणाची तरी आठवण आपलीच आठवण होऊन जा ते. 31 मार्च या दिवसाचं असंच एक विशेष आहे.

लेखक, चित्रकार श्रीकांत धोंगडे यांनी मीनाकुमारीचे चरित्र सांगायचा घाट घातलाय. त्याचं शीर्षकदेखील त्यांनी पक्कं केलं आहे. अतृप्ता !! देहाला वेढलेल्या इच्छा, आकांक्षा तिच्या कधी पुऱ्या झाल्या नाहीत. पूर्ततेसाठी तिने जे जे मार्ग शोधले त्याने ती वासनेच्या वणव्यातच सापडली. पण तिला हे सगळं कळत नव्हतं असं थोडंच आहे? की अतृप्ततेची बेहोषी तिला हवी होती ? मात्र पडद्यावरच्या तिच्या प्रतिमेच्या प्रेमात पडलेल्या चित्ररसिकाला तिने कधीच अतृप्त ठेवलं नाही. जाणिवेचं माप सदैव वाढतंच ठेवलं… हा सगळा धांडोळा श्रीकांत धोंगडे यांनी घेतलेला आहे. त्यावरून आठवलं, मीनाकुमारी भरभरून मुक्त आणि तृप्त झाली ती तिच्या शायरीमध्ये. मीनाकुमारीच्या कहाणीचं त्यांनी नाव ठेवलंय ‘शायरा !’

तिच्या स्वप्नातल्या समाप्तीची भैरवी करताना अंजन कुमार लिहितात, ‘त्या दिव्यापाशी काळोख सोडला. मुक्त झाले. मुक्तीच्या क्षणातली बेहोषी इथेही आहे. या दुनियेत. तो मधुमंद श्वासही आहे. थेंबा-थेंबातले गर्दगडद रंग आहेत. चांदण्या-चांदण्यात आरस्पानी सूर आहे. माझी गझल आहे. त्यातला हळवा निशिगंध आहे. सारं कसं मुग्ध आहे. इथली प्रत्येक गझल चांदण्याची. प्रत्येक महाल चांदण्यांचा. शेज चांदण्यांची. थेंबाचं पात्र चांदण्यांचं. सगळे पहारे चांदण्याचे. काय सांगू? एक मुक्त मीनाकुमारी इथे चांदण्यात अशी बंदिस्त आहे.

’स्वत मीनाकुमारीने म्हटलंय, “टुकडे टुकडे दिन बीता, धज्जा धज्जा रात मिला, जिसका जितना आंचल था, उतनीही सौगात मिली …” (जन्म 1 ऑगस्ट 1932 – मृत्यू 31 मार्च 1972) एवढ्या आयुष्यात या बाईने अनेक आयुष्यात भोगायला मिळतं ते भोगून टाकलं. कधी स्वतच्या मर्जीने, तर कधी दुसऱ्याच्या. या तिच्या वाटेवरचा सहचर होता गुलजार. त्यांच्या त्या
नात्याला काय नाव द्यायचं? त्याने मात्र म्हटलंय, “शहतूत की शाखा पर बैठी मीना बुनती है रेशम के धागे, लम्हा
लम्हा खोल रही है अपनेही धागो के कैदी, रेशम की यह शायर एक दिन अपनेही धागो में घुटकर मर जाएगी …”
यावर मीनाकुमारीने काय म्हणावं? ती म्हणते, “जानते हो न, वे धागे क्या है? उन्हे प्यार कहते है, मुझे तो प्यार से प्यार है. प्यार के एहसास से प्यार है. प्यार के नाम से प्यार है, इतना प्यार कोई अपने तनसे लिपटाकर मार सके तो और क्या चाहिये?”

म्हणजे तिने करून सवरून हे सगळं ओढवून तर घेतलं नाही ना ? म्हणजे एका परीने गुलजार आणि मीनाकुमारी यांनी एकमेकांना जाणून घेतलं होतं तर. एरवी जे काही देण्याजोगं होतं ते देऊन झालं होतं. शिल्लक काहीच नाही राहिलं. पण डायरी भर विखुरलेली तिची शायरी मात्र होती. तिने ती गुलजारच्या नावे करून टाकली. गुलजारनेदेखील ती थोड्या अवधीत ‘मीनाकुमारी की शायरी’ या नावाने प्रकाशित करून टाकली. ती देवनागरी प्रत वाचताना वाटलं मीनाकुमारीच्या उर्दू हस्ताक्षरात एखादा नमुना द्यायला हवा होता. अजूनही मला त्या बद्दल कुतूहल आहे. काय करता येईल? माझा हा आवाज गुलजार यांच्यापर्यंत पोहोचेल का ? असं म्हणतात गुलजार यांच्यापर्यंत मराठी आवाज पोहोचतो तो अरुण शेवते यांच्या मार्फत. तेव्हा त्यांच्या मार्फत जरी हे काम झालं तर आनंदच आहे.

आठवता आठवता आठवण झाली साधना खोटे यांची. त्यांचा आवाज बराचसा मीना कुमारीच्या आवाजाशी मिळता जुळता आहे. मीनाकुमारीची कहाणी त्यांच्याच शब्दांत, असा एक कार्यक्रम त्या करत असत. अभिनेत्री राखी यांचा आवाजदेखील मीनाकुमारी यांच्या आवाजाशी मिळता जुळता आहे. पण शेवटी शिल्लक राहतात आणि राहतील ते तिचे वेगवेगळे सिनेमे. अगदी ‘बैजू बावरा’पासून ‘पाकीजा ’, ‘मेरे अपने’पर्यंत. ते पाहून प्रत्येक वेळी मनात प्रश्न येतो अशी होती मीनाकुमारी ? कशी होती मीनाकुमारी ? कोणत्याही लेखकाला आव्हान देणारी ही कहाणी आहे असं मी नेहमीच म्हणतो. 31 मार्च हे आणखी एक निमित्त. बघूया कोण कोण काय करतात ते…