माढ्याच्या तिढ्यासाठी मुंबईत जोर बैठका; फडणवीसांची शिष्टाई निप्रभ

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून सुरू असलेला तिढा अजूनही कायम आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा तिढा सोडवण्यासाठी आज बैठक बोलवली होती, परंतु त्यांची शिष्टाई निष्प्रभ ठरली. या बैठकीला उपस्थित असलेले रामराजे नाईक-निंबाळकर यांनीच या बैठकीत कोणताही निर्णय झाला नसल्याची पोस्ट टाकत सोशल मीडियावर स्पष्ट केले.

माढा मतदारसंघात रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना महायुतीची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर, विजयसिंह मोहिते-पाटील आणि उत्तमराव जानकर यांनी विरोध दर्शवला होता. त्यामुळे निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी फडणवीस यांनी सातारा व सोलापुरातील प्रमुख नेत्यांची बैठक सागर निवासस्थानी बोलवली होती.

या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह रामराजे नाईक-निंबाळकर, माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे, सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर, फलटण नगर परिषदेचे माजी नगरसेवक अनिकेत नाईक-निंबाळकर, आमदार श्रीकांत भारतीय आणि उत्तमराव जानकर उपस्थित होते.

धैर्यशील मोहितेपाटलांचा प्रचार सुरू

माढा लोकसभेसाठी भाजपचेच आमदार धैर्यशील मोहिते-पाटील इच्छुक होते, परंतु भाजपने रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी दिल्याने मोहिते-पाटील घराणे नाराज झाले आहे. गेल्या काही दिवसांमध्ये यावर कोणताही तोडगा न निघाल्याने आता धैर्यशील मोहिते-पाटील यांनी माढय़ात अनौपचारिकरीत्या प्रचाराला सुरुवात केली आहे. मंगळवारी त्यांनी करमाळा तालुक्यात श्रीदेवीचा माळ, पोथरे, कामोणे, बिटरगावश्री, आळजापूर, खडकी, जातेगाव, पुनवर, वडगाव आणि मांगी या गावांना भेट दिली.

अफवांवर विश्वास ठेवू नका – रामराजे

सुमारे पाऊण तास ही बैठक चालली. बैठकीनंतर आमदार श्रीकांत भारतीय यांनी सगळे काही ठीक आहे, अशी प्रतिक्रिया दिली. तिढा सुटल्याचे वृत्त भाजपवाल्यांनी वाऱ्यासारखे पसरवले. मात्र रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या सोशल मीडियावरील पोस्टने भाजपच्या या दाव्यातील हवाच काढून टाकली. महायुतीचा धर्म पाळावा अशी सूचना आपल्याला या बैठकीत करण्यात आली आहे. स्थानिक कार्यकर्ते आणि समविचारी नेत्यांशी चर्चा करून पुढील निर्णय देऊ असे आपण स्पष्ट सांगितले आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन रामराजे यांनी केले.