छत्रपतींच्या नावाने निवडून आलेल्यांनी हुकूमशाही पद्धतीने आमचे निलंबन केले; अमोल कोल्हेंचा मोदी सरकारवर हल्लाबोल

संसदेतील घुसखोरीच्या मुद्द्यावरून सरकारला जाब विचारणाऱ्या आणखी 49 खासदारांचे मंगळवारी निलंबन करण्यात आले आहे. त्यामुळे निलंबित खासदारांचा एकूण आकडा तब्बल 141 वर पोहोचला आहे. लोकसभेतून निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये महाराष्ट्रातील सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे या दोन खासदारांचाही समावेश आहे. निलंबनाची कारवाई झाल्यानंतर अमोल कोल्हे यांनी मोदी सरकारवर हल्ला चढवला आहे. त्यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत आपला संताप व्यक्त केला आहे.

शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात लावू नका, अशी छत्रपती शिवाजी महाराजांची त्यांच्या प्रशासनाला ताकीद होती. मात्र छत्रपतींच्या नावाने मते घेऊन सत्तेत आलेले हुकूमशहा मात्र शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाच नव्हे तर शेतकऱ्याच्या जीवालाच हात घालायला निघालेत. कांद्यावरील निर्यातबंदी उठवा, यासाठी संसदेत चर्चा करण्याची मागणी आम्ही करत होतो म्हणून हुकूमशाही पद्धतीने आमचे निलंबन करण्यात आले, अशा शब्दांत अमोल कोल्हे यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमीतील मावळे आहोत, संघर्ष हा आमच्या रक्तात आहे. प्रसंगी आम्ही रस्त्याचं रणांगण करू, पण शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत प्राणपणाने लढू. हाच निश्चय करत कांदा निर्यातबंदीच्या विरोधात खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह सहकारी पक्षांच्या खासदारांसोबत संसद परिसरात आंदोलन केले, अशी माहिती अमोल कोल्हे यांनी दिली.

लोकसभेतून अधिवेशन काळासाठी निलंबित करण्यात आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर टिकास्त्र सोडले. त्या म्हणाल्या की, आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेले सदस्य आहोत. मात्र सध्या सरकारकडून दडपशाही सुरू आहे. त्यामुळे 100 हून अधिक खासदारांचे निलंबन करण्यात आले आहे. पण आम्ही काय मागतोय? आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की, संसदेत जी घुसखोरी झाली, त्याबद्दलच सत्य समोर यावे. त्यावरच चर्चा झाली पाहिजे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर सरकारतर्फे म्हणणं मांडले पाहिजे. भाजप खासदाराच्या पासवर आत आलेली दोन मुले संसदेत घुसली. त्यावर चर्चा व्हायला नको? ही दडपशाही आहे, असे त्या म्हणाल्या.