पाकिस्तान निवडणूक: मतदानाआधी बलुचिस्तानमध्ये दोन स्फोट, 20 ठार

पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात निवडणुकीच्या पूर्वसंध्येला झालेल्या दोन बॉम्बस्फोटात किमान 20 लोक ठार झाले आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

पिशीन जिल्ह्यात अपक्ष उमेदवाराच्या पक्ष कार्यालयासमोर झालेल्या पहिल्या स्फोटात 12 जण ठार झाले. किल्लाह सैफ उल्लाह जिल्ह्यात सुमारे 150 किमी अंतरावर झालेल्या दुसऱ्या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला. या दोन्ही बॉम्बस्फोटात अनेक जण जखमी झाले आहेत. ही निवडणूक मोठ्याप्रमाणात झालेला हिंसाचार आणि हेराफेरीच्या दाव्यांमुळे चर्चेत आली आहे.

पिशीनमधील हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. दुसऱ्या स्फोटाचे तपशील अद्याप समोर येत आहेत.

सोशल मीडियावरील व्हायरल झालेल्या फोटोंमधून पिशीनमधील स्फोटात कार आणि मोटारसायकलचे नुकसान झाल्याचं दिसत आहे. ही घटना स्थानिक अपक्ष उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयाबाहेर घडली ते उमेदवार मतदारांची भेट घेत होता, अशी माहिती बीबीसीच्या वृत्तात दिली आहे.

बलुचिस्तान आणि खैबर पख्तुनख्वा या दोन्ही प्रांतांमध्ये गेल्या आठवड्यात मतदानाआधी हिंसक घटना घडल्या होत्या.

पोलीस स्फोटाचे कारण शोधण्याचा प्रयत्न करत असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

बलुचिस्तानमध्ये मतदानाच्या नियोजनातमात्र कोणताही फेरफार होणार नाही, अशी माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे.

‘निश्चिंत राहा. आम्ही दहशतवाद्यांना लोकशाहीतील या महत्त्वपूर्ण प्रक्रियेला कमकुवत किंवा नष्ट करू देणार नाही’, असा विश्वास मंत्री जान अचकझाई यांनी X वर पोस्ट करत व्यक्त केला आहे.