मी तिच्या बाष्कळ बोलण्याचं उत्तर देणार नाही, प्रियांका गांधींचा कंगनाला टोला

काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशच्या सहारनपूर येथे प्रचार सभा घेतली. या दरम्यान त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही आम्हाला देशभक्ती शिकवू नका, कारण आमच्या कुटुंबातील लोक देशासाठी शहीद झाले आहेत आणि आम्हाला माहीत आहे की धर्म काय आहे, असं प्रियांका गांधी म्हणाल्या. दरम्यान, गांधी यांनी कंगनाच्या बोलण्याला बाष्कळ म्हणत टोलाही हाणला आहे.

या सभेनंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत सोनिया गांधी म्हणाल्या की, सरकारने आम्हाला देशभक्ती काय ते शिकवू नये. आमच्या कुटुंबातील लोक शहीद झाले आहेत. त्यामुळे खरा धर्म काय हे आम्हाला ठाऊक आहे. आम्ही सत्तेला नव्हे तर शक्ती आणि सत्याची पूजा करतो. आज जे सत्तेत आहेत, ते शक्तीचे नव्हेत तर सत्तेचे उपासक आहेत. अस्सल राम भक्त तोच जो सत्याच्या मार्गावर चालतो. मग तो कुठल्याही धर्म किंवा पंथाचा का असेना, असं गांधी यावेळी म्हणाल्या.

कंगना रणौतवर निशाणा साधताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, आम्ही खूपच आभारी आहोत की ती आमच्याविषयी बोलते. पण, मी तिच्या या बाष्कळ बडबडीला उत्तर देणार नाही. सोनिया यांना माझे वडील हयात असल्यापासून वाईटसाईट बोललं जात आहे, असंही प्रियांका गांधी यांनी म्हटलं.

मोदींच्या गॅरंटीवरही टीका करताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, मोदींनी तर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख येण्याची घोषणा केली होती. ते पैसे आले का? दोन कोटी रोजगार मिळतील असंही ते म्हणाले होते. मिळालेत का? मोदींना देशात महागाईच्या ओझ्याखाली पिचत असलेला सामान्य माणूस, गरीब, शेतकरी, तरुण यातलं काहीही दिसत नाही. ते स्वतःला जगातला सगळ्यात मोठा नेता मानतात. त्यांच्याकडे अमर्याद सत्ता आहे. मग त्या सत्तेचा वापर करून 10 वर्षांत रोजगारनिर्मिती का केली नाही, महागाई नियंत्रित का केली नाही. लोकांच्या हिताचं काम का केलं नाही, अशी प्रश्नांची सरबत्तीही गांधी यांनी यावेळी केली.