नाव मोठं लक्षण खोटं, बड्या कंपन्या वाढवताहेत प्लास्टिक प्रदूषण

अनेक ब्रँडेड बहुराष्ट्रीय कंपन्या प्लास्टिक प्रदूषण पसरवण्याचे काम करताहेत. जागतिक प्रदूषणात या कंपन्यांचा 50 टक्के वाटा आहे. कोका कोला कंपनी तर 11 टक्के प्लास्टिक कचऱयासाठी जबाबदार आहे. या बड्या कंपन्यांनी प्लास्टिकची उत्पादने कमी केली तर प्रदूषणाला आळा बसेल.

नुकताच सायन्स अॅडव्हान्सेसमध्ये प्लास्टिक कचऱ्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अभ्यास प्रकाशित झाला आहे. या अभ्यासासाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन, स्वीडन, न्यूझीलँड, फिलीपाइन्स, एस्टोनिया आणि चिली राष्ट्रांमधील विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी संशोधन केले. मागील पाच वर्षांचा आढावा घेण्यात आला. 84 देशांमधील 1576 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. अभ्यासाअंती असे दिसून आले की, 56 प्रमुख जागतिक कंपन्या ब्रँडेड प्लास्टिक प्रदूषण पसरवण्यास जबाबदार आहेत.

प्लास्टिकचे उत्पादन आणि त्यामुळे होणारे प्रदूषण यावर प्रकाश टाकणारा हा अभ्यास आहे. त्यासाठी अनेक देशांतील शास्त्रज्ञांनी सहभाग घेतला. कन्झ्युमर गुड्स पंपन्या या प्रदूषणाला जास्त जबाबदार असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

कोणत्या कंपन्या…

कोका कोला कंपनी 11 टक्के, तर पेप्सिको 5 टक्के, नेस्ले 3 टक्के, डेनोन 3 टक्के आणि फिलीप मॉरिश इंटरनॅशनल 2 टक्के या प्रमाणात प्रदूषण पसरवतात. खाद्य, पेय आणि तंबाखू बनवणाऱया कंपन्या जास्त प्रदूषण करतात. तंबाखू उत्पादने घेणार्या कंपन्या पर्यावरणासोबत लोकांच्या आयुष्याशीही खेळत आहेत. 50 टक्क्यांपेक्षा अधिक प्लॅस्टिक प्रदूषण बहुराष्ट्रीय कंपन्या करत आहेत.

– ज्या कंपन्या प्लॅस्टिकचा अतिरेकपणे वापर करत असतील अशा पंपन्यांवर कायदेशीर दंड आकारला जायला हवा. प्रदूषण संकट दूर करण्यासाठी कडक अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

– प्लॅस्टिक समस्या दूर करण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्यांनी पुढाकार घ्यायला हवा. प्लॅस्टिक ऐवजी या कंपन्यांनी काच किंवा धातूचा वापर करायला हवा.

वापर कमी करा

प्लास्टिकचे उत्पादन जेवढे जास्त तेवढे प्लास्टिक पर्यावरणात दिसते. वन टाईम युज होणारी प्लास्टिकची उत्पादने प्रदूषणाला कारणीभूत आहेत. विशेष करून पॅकेजिंग साहित्यामुळे अधिक प्रदूषण होते. प्लास्टिक उत्पादनांचा वापर कमी केल्यास ही समस्या सुटू शकते.