चालकाचे नियंत्रण सुटून ट्रकची दुचाकींवर धडक, एक ठार तर एकजण जखमी

मुदखेड तालुक्यातील बारड भोकरफाटा महामार्ग क्रमांक 61 वर आज सकाळी आठच्या सुमारास भरधाव वेगात असलेल्या ट्रकच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने महामार्ग शेजारी उभ्या असलेल्या दहा मोटारसायकलवर हा ट्रक धडकला. या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, बारड राष्ट्रीय महामार्ग चौकामध्ये भोकरकडून नांदेडला जाणार्‍या भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने चौकामध्ये उभ्या असलेल्या अनेक दुचाकी वाहनावर हा ट्रक धडकला. त्यात रस्त्याच्या शेजारी उभ्या असलेल्या दहा दुचाकींवर हा ट्रक धडकला. त्यात या दुचाकी वाहनाचे मोठे नुकसान झाले. तर गोविंद रामजी कोरेवाड यांच्या डोक्याला मार लागून ते जागीच ठार झाले तर सुनील राठोड रा.किनवट यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

घटनेची माहिती मिळताच बारडचे महामार्ग पोलीस निरीक्षक राजेश यलगुलवार, कवळे, बारड पोलीस निरीक्षक संतोष केदासे यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले तर महामार्ग पोलिसांनी रस्त्यावरील ट्रॉफिक सुरळीत करुन मार्ग मोकळा करुन दिला. याबाबतची पुढील कारवाई बारड पोलीसांकडून सध्या सुरु आहे. घटना घडली त्या ठिकाणी कुठलीही वाहतूक चिन्हे नाहीत, वाहनाचा वेग किती असावा याचे फलक नाही, तसेच रस्त्यावर गतिरोधक सुध्दा नाही, त्यामुळे हि घटना घडली. घटना घडताच अपघातस्थळी बघ्यांची गर्दी वाढली.