राजभवनात टपाल पोचपावतीवर निर्बंध

राज्यपाल हे राज्याचे कार्यकारी प्रमुख म्हणून ओळखले जातात. त्यामुळे न्याय मागण्यासाठी अनेकजण राज्यपालांकडे धाव घेऊन लेखी तक्रार करतात. पण राजभवनावर सध्या तक्रारीच्या पत्राला पोचपावती देण्याच्या वेळेवर निर्बंध आणले आहेत. सध्या दुपारी 3 ते 4 या वेळेतच तक्रारीच्या पत्राला पोचपावती दिली जाते. त्याव्यतिरिक्त वेळेत तक्रारीचे पत्र टपाल पेटीत टाकावे लागते. त्यामुळे अनेकांची गैरसोय होत आहे.

राज्यपालांकडे तक्रार केल्यावर तक्रारीच्या झेरॉक्सवर सरकारी शिक्का मारून पोचपावती दिली जाते, पण सध्या यावर निर्बंध आणले आहेत. 3 ते 4 या वेळेत आलेल्या तक्रारीला पोचपावती दिली जाते. या वेळेव्यतिरिक्त वेळेत तक्रार केल्यास तक्रारीचे पत्र टपालपेटीत टाकावे असा फलकच लावला आहे. यासंदर्भात आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी राज्यपाल रमेश बैस यांना पत्र पाठवले आहे. राजभवनावर येणाऱया प्रत्येक पत्राला पोच आवश्यक असते. पेटीत पत्र टाकणे योग्य नाही. यापूर्वी अशी पद्धत नव्हती. असे निर्बंध लावणे चुकीचे आहे. यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. राजभवनात टपालाची पोच कार्यालयीन वेळेत देण्यात यावी. शक्य झाल्यास मुख्य प्रवेशद्वारावर सर्वसामान्य टपाल व अन्य पत्रव्यवहार करण्यासाठी पोच व्यवस्था निर्माण करावी अशी मागणी करण्यात आली आहे.