ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा जिंकणार; संजय राऊत यांचा शंखनाद

sanjay-raut

लोकसभा निवडणुकीसाठी मिंधे गटाने गुरुवारी 8 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यात ठाणे, कल्याण, पालघर आणि नाशिक मतदारसंघांचा समावेश नाही. हे मतदारसंघ आपल्याला मिळावेत यासाठी भाजपने मिंधे गटावर वेगवेगळ्या मार्गाने दबाव आणला आहे. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनीही प्रतिक्रिया दिली. “गटातटाचे जे राजकारण सुरू आहे किंवा भाजपचे जे मांडलिक, गुलाम आहे त्यांच्याविषयी आता काही बोलण्यासारखे राहिलेले नाही. राजन विचारे हे ठाण्यातून आमचे उमेदवार असून त्यांचे नाव जाहीर झाले आहे. पालघर आणि कल्याण-डोंबिवलीचे उमेदवार उद्या जाहीर होतील. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा आम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही”, असा शंखनाद राऊत यांनी केला.

शुक्रवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना खासदार Sanjay Raut म्हणाले की, राजन विचारे हे शिवसेनेचे ठाण्यातील उमेदवार असून त्यांचे नावही जाहीर झाले आहे. त्यामुळे दुसरा गट शिवसेना म्हणून भाजपबरोबर व्यवहार करत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पालघर या ठाणे जिल्ह्यातील जागा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना लढणार आहे. असली शिवसेना बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांची असून आम्ही आमचे उमेदवारही जाहीर केले आहेत. ठाणे, कल्याण-डोंबिवली आणि पालघरही आम्ही जिंकू. ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक जागा शिवसेना जिंकल्याशिवाय राहणार नाही. मी असली शिवसेनेविषय बोलत असून डुप्लिकेट शिवसेनेबाबत नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

जागावाटपाबाबत मिंधे गट अद्यापही वेटिंगवर असल्याबाबत विचारले असता राऊत म्हणाले की, “काही दिवसांपासून ते दिल्लीत वेटिंगवरच आहेत. भाजप नेत्यांच्या लॉनवर त्यांना रुमाल टाकून बसावे लागतेय. काही दिवसांनी सत्तेत परिवर्तन होईल तेव्हा सगळे वर्षा बंगल्याबाहेर वेटिंगवर दिसतील.”

दरम्यान, 3 एप्रिल रोजी मुंबईतील शिवालय येथे महाविकास आघाडीची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, नाना पटोले, पृथ्वीराज चव्हाण आणि इतर सर्व घटकपक्षांचे नेते उपस्थित राहतील. तसेच 31 तारखेला दिल्लीतील रामलीला मैदानावर इंडिया आघाडीची महारॅली होणार आहे. या महारॅलीला महाराष्ट्रातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारही उपस्थित राहणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

वंजित बहुजन आघाडीबाबत प्रश्न विचारला असता राऊत म्हणाले की, “संविधान वाचवण्याची जबाबदारी या देशातील प्रत्येक नागरिकाची आहे. आम्ही आमचे कर्तव्य पार पाडत आहोत. आंबेडकरांनाही याबाबत आवाहन केले आणि त्यांच्याशी चर्चाही केली. संविधानाच्या पाठीत खंजीर खुपणाऱ्यांच्या बाजुने, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे ते उभे राहणार नाहीत याची आम्हाला खात्री आहे. ते आंबेडकर आहेत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा ते घेऊन पुढे निघाले आहेत आणि आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.”