नागपूरमधून विकास ठाकरे, भंडाऱयातून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील कॉँग्रेसच्या चार उमेदवारांची दुसरी यादी आज जाहीर झाली. नागपूरमधून विकास ठाकरे, भंडारा-गोंदिया प्रशांत पडोळे, गडचिरोली नामदेव किरसान, रामटेक रश्मी बर्वे यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसने आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. भंडारा गोंदियामधून डॉ. प्रशांत पडोळे यांना संधी देण्यात आली आहे. यामुळे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे लोकसभेच्या रिंगणात उतरणार नाहीत, हेही आज स्पष्ट झाले. आजच्या यादीत चंद्रपूरचे नाव नसल्यामुळे या ठिकाणी वडेट्टीवार कुटुंबातील सदस्याला संधी मिळणार की आमदार प्रतिभा धानोरकर बाजी मारणार, याबाबतचा संभ्रम कायम आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यातील दुसरी यादी आणि देशपातळीवर चौथी यादी जाहीर केली. यामध्ये एकूण 45 उमेदवारांचा समावेश आहे. यामध्ये पश्चिम बंगाल, छत्तीसगड, मिझोराम, आसाम, अंदमान, निकोबारमधील प्रत्येकी 1, जम्मू-कश्मीर 2, मध्य प्रदेश 12, मणिपूरमधील 2, राजस्थान 3, तामीळनाडू 7, उत्तर प्रदेश 9, उत्तराखंडमधील 2 उमेदवारांचा समावेश आहे.

n मध्य प्रदेशच्या राजगडमधून माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना तिकीट देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात वाराणसीतून अजय राय यांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे.