प्रियकराने आत्महत्या केल्यास प्रेमिकेला जबाबदार धरता येणार नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

जर कुणी प्रेमात अपयशी झाल्याने आत्महत्या केली किंवा एखाद्याने खटला हरल्यामुळे आत्महत्या केली किंवा पेपर खराब गेला म्हणून कुणा विद्यार्थ्याने आत्महत्या केली तर अनुक्रमे महिला, परीक्षक किंवा वकिलाला दोषी ठरवता येणार नाही, असा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली हायकोर्टाने दिला. या निर्णयामुळे एका मुलीने तिच्या मित्राला आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी दाखल खटल्यात संबंधित मुलीला अटकेपासून दिलासा मिळाला.

एखाद्या अत्यंत कमकुवत किंवा दुर्बल मानसिकता असलेल्या व्यक्तीने चुकीचे पाऊल उचलले तर त्याला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा ठपका दुसऱया व्यक्तीवर ठेवता येणार नाही, असे हायकोर्ट म्हणाले. एका प्रकरणात मुलगी आणि तिचा मित्र यांच्याविरोधात 6 मे 2023 रोजी एका तरुणाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली खटला दाखल करण्यात आला होता. याविरोधात दोन्ही आरोपींनी हायकोर्टात आव्हान याचिका दाखल केली होती. दोघांच्या याचिका न्यायमूर्ती अमित महाजन यांनी मंजूर केल्या.

 

मृत तरुणाच्या वडिलांची दोघांविरोधात तक्रार

मृत तरुणाने आत्महत्येपूर्वी एक चिठ्ठी लिहून ठेवली होती. या चिठ्ठीत त्याने त्याचा मित्र आणि मैत्रीण यांच्या नावांचा उल्लेख केला होता. या चिठ्ठीचा हवाला देत त्याच्या वडिलांनी दोघांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.