आमदार अपात्रता प्रकरण – विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी सुरू

आमदारांच्या अपात्रतेप्रकरणी विधानभवनाच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये सुनावणी सुरू आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर ही सुनावणी सुरू असून मूळ शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मिंधे गटाचे वकील, नेते, आमदार या सुनावणीला उपस्थित आहेत. यावेळी शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी सर्व याचिकांवर एकाचवेळी सुनावणी घेण्याचा युक्तीवाद केला.

आमदारांच्या अपात्रतेबाबत राहुल नार्वेकर यांनी गेल्या 14 सप्टेंबर रोजी सुनावणी घेतली होती. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आमदारांच्या अपात्रतेच्या सुनावणीला विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने नाराजी व्यक्त करतानाच एका आठवड्यात सुनावणी घेण्याचे निर्देश दिले होते.

सर्वोच्च न्यायालयाने कान टोचल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना झाले होते. तिथे त्यांनी कायदेतज्ञांचा सल्ला घेतला. त्यानंतर आमदार अपात्रतेप्रकरणी आज सुनावणी घेण्याचे ठरले. ही सुनावणी सुरू झाली असून या दरम्यान पुढील प्रक्रियेचे वेळापत्रकही ठरणार आहे.

अंबादास दानवे यांचे ट्विट

दरम्यान, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. उशिराने मिळालेला न्याय म्हणजे एकप्रकारे केलेला अन्यायच ठरतो. विधानसभेच्या अध्यक्षांनी मान सन्मान टिकवून ठेवण्यासाठी वेळकाढूपणा न करता निकाल लवकरात लवकर दयावा, असे अपेक्षित आहे, असे ट्विट अंबादास दानवे यांनी केले आहे.