गोरेगावमध्ये बेस्ट बस आणि रिक्षाचा भीषण अपघात, दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू

पोईसर आगारातून घाटकोपर आगाराकडे जाणाऱ्या दोन बेस्ट बसेस आणि ऑटोरिक्षाच्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेच्या गोरेगाव चेक नाका पुलावर ही घटना घडली. जॉनी संखाराम (वय 42) आणि सुजाता पंचकी (वय 38) अशी मृत प्रवाशांची नावे आहेत.

बस क्रमांक 1453 (एमएच 01 एपी 0226) आणि बस क्रमांक 1862 (एमएच 01 एपी 0746) या दोन्ही बस आगार हस्तांतरणासाठी पोईसर डेपोतून घाटकोपर डेपोकडे जात होत्या. बस क्रमांक 1453 हे संतोष विष्णू देवूलकर (53) चालवत होते, तर बस क्रमांक 1862 हे संतोष शंकर घोंगे (45) चालवत होते. यावेळी साधारणतः रात्री 1:45 च्या सुमारास, बस क्रमांक 1862 च्या चालकाने ब्रेक दाबला त्यानंतर बस क्रमांक 1453 च्या चालकाने देखील ब्रेक दाबला. मात्र मुसळधार पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने, बस क्रमांक 1453 घसरली. यावेळी ही बस प्रथम बस क्रमांक 1862 धडकली आणि नंतर ऑटोरिक्षाला धडकली.

यावेळी ऑटोरिक्षातील जॉनी संखाराम आणि सुजाता पंचकी हे प्रवासी गंभीर जखमी झाले. पोलिसांनी त्यांना तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी जॉनी संखाराम यांना मृत घोषित केले. तर सुजाता पंचकी यांना अंधेरीतील कोकिलाबेन रुग्णालयात हलवण्यात आले, तिथे पहाटे 3:45 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान ऑटोरिक्षा चालकाला किरकोळ दुखापत झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस तपास करत आहेत.