वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील मृतांच्या वारसांना 25 लाखांची मदत, राज्य सरकारचा निर्णय

गव्याला पकडण्याचा प्रयत्न युद्धपातळीवर सुरू आहे.

राज्यात सध्या मनुष्य वस्तीत वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे. अनेकदा नागरिकांवर हल्ला केल्याच्या घटना घडत असून त्यात नागरिकांचा बळी जात आहे. काही जण गंभीर जखमी झाल्याने अपंगत्व येत आहे. त्या पार्श्वभूमीवर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसांना 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर अपंगत्व आल्यास साडेसाच लाख रुपये, गंभीर जखमी झाल्यास पाच लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. त्यामुळे मृतांच्या वारसांना मोठा दिलासा मिळणार आहे.

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास संबंधितांना दिली जाणारी आर्थिक मदत तुटपुंजी आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू, कायमस्वरुपी अपंगत्व, गंभीर जखमी आणि किरकोळ जखमी व्यक्तीला दिल्या जाणाऱया आर्थिक मदतीत वाढ करण्याची मागणी राज्य सरकारच्या विचाराधीन होती. तसेच लोकप्रतिनिधींकडूनही  आर्थिक साहाय्य वाढवण्याची मागणी होत होती. त्याची दखल घेत सरकारने आर्थिक मदतीची रक्कम वाढवण्याचा निर्णय घेत त्याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे.

मृताच्या वारसांना दिली जाणारी रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवणार

वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या वारसाला 25 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. त्यापैकी 10 लाखांची रक्कम तत्काळ धनादेशाद्वारे संबंधित वारसांना दिली जाणार असून उर्वरित 15 लाखांपैकी 10 लाख रुपये पाच वर्षांसाठी तर 5 लाख रुपये दहा वर्षांसाठी मुदत ठेव म्हणून ठेवली जाणार आहे. दहा वर्षांनंतर वारसांना पूर्ण रक्कम मिळणार आहे.

  • वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झाल्यास संबंधिताला खासगी रुग्णालयात उपचार घेणे आवश्यक असेल, तर सरकारकडून प्रतिव्यक्ती 50 हजार रुपये एवढी मदत दिली जाणार आहे. दरम्यान, वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीने उपचार सरकारी रुग्णालयात करावेत असेही सरकारने स्पष्ट केले आहे.