हॅलो, मी इन्स्पेक्टर विजयकुमार बोलतोय, ‘एआय’चा वापर करून महिलेला एक लाखाला फसवले!

आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) चा वापर करून एका उच्चशिक्षित महिलेची फसवणूक झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील 58 वर्षीय प्राध्यापक महिलेला एका अज्ञात क्रमांकावरून पह्न आला. मुंबई पोलिसात पोलीस निरीक्षक असल्याचे सांगून या व्यक्तीने हा पह्न केला होता. ‘‘मी इन्स्पेक्टर विजय कुमार बोलतोय. तुमच्या मुलाला आम्ही एका प्रकरणात ताब्यात घेतले आहे, तातडीने एक लाख रुपये ट्रान्सफर करा, नाहीतर त्याला अटक केली जाईल,’’ असे समोरच्या व्यक्तीने महिलेला सांगितले. घाबरलेल्या अवस्थेत त्यांनी तातडीने त्यांच्या मुलाला पह्न केला. पण दोन वेळा पह्न करूनही मुलाने पह्न न उचलल्यामुळे मुलाला अटक होऊ शकते या भीतीने महिलेने समोरच्या व्यक्तीने दिलेल्या दोन स्वतंत्र खात्यांवर एक लाख रुपये ट्रान्सफर केले. पण पुढच्या काही मिनिटांत मुलाचा पह्न आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी जुहू पोलीस स्थानकात यासंदर्भात तक्रार दाखल केली.

कशी झाली फसवणूक?

आरोपींनी एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सदर महिला प्राध्यापिका व त्यांच्या मुलाची सर्व माहिती सोशल मीडियावरून मिळवली. या माहितीचा वापर करून त्यांना पह्न करण्यात आला व मुलाविषयी धमकावण्यात आले.

बँक खाती गोठवणार?

हा सगळा प्रकार उघड झाल्यानंतर महिला प्राध्यापिकेने पैसे ट्रान्सफर केलेली दोन बँक खाती गोठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. दोन स्वतंत्र बँकांमध्ये ही खाती असून त्या दोन्ही बँकांशी संबंधितांची माहिती काढण्यासाठी संपर्क करण्यात आल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.