थोडी लाज असेल तर राजीनामा द्या, आदित्य ठाकरे यांचा हल्ला

जालन्यात मराठा आंदोलकांवर लाठीमार करणारे सरकार जनरल डायरचे आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी आज केला. मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय पोलीस एवढा भयानक लाठीमार करणे अशक्य असून थोडी लाज असेल तर आता खोके सरकारने राजीनामा द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

आदित्य ठाकरे यांनी बीडीडी चाळीतील मान्सून महोत्सवाला हजेरी लावली होती. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी जालन्यातील घटनेवरून सरकारवर सडकून टीका केली. एखाद्या शत्रूवर हल्ला करावा असा लाठीमार सरकारने जालन्यात मराठा आंदोलकांवर करायला लावला, असे ते म्हणाले. एवढा लाठीमार करण्याची गरज होती का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

सरकारच्या आदेशाशिवाय हे अशक्य

एवढे संवेदनशील आंदोलन होत असताना, मुख्यमंत्र्यांना न कळवता पोलीस लाठीमार करणे अशक्य आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना त्याची शंभर टक्के कल्पना असणार. सरकारच्या आदेशावरूनच हा लाठीमार झाला आहे, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी मिंधे सरकारच्या अत्याचाराची उदाहरणेही यावेळी दिली. ते म्हणाले की, राजापुरातील बारसू येथे असेच आंदोलन झाले होते. तिथेही महिलांवर लाठीमार आणि अत्याचार झाला. खारघरमध्ये श्रीसेवकांचे मृत्यू झाले त्याचीही चौकशी झाली नाही. वारकऱ्यांवरही असाच लाठीमार झाला. आता मराठा समाजाच्या तरुणांवर, महिलांवर लाठीमार झाला. तरीही सरकार लाज नसल्यासारखे वागत आहे, अशी संतप्त टीकाही त्यांनी केली.