संजय सिंह यांना ईडीकडून अटक. पहाटे घरावर छापेमारी

विरोधी पक्षांच्या नेत्यांवर सुडाने कारवाई करण्याचे ईडीचे सत्र सुरूच असून, आज आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांना अटक करण्यात आली. दिल्लीतील कथित मद्य घोटाळाप्रकरणी ईडीने ही कारवाई केली. दरम्यान, या कारवाईमुळे विरोधी पक्षांनी मोदी सरकार आणि ईडीविरोधात तीव्र संताप व्यक्त केला  आहे.

सकाळी 7च्या सुमारास ईडी अधिकाऱयांचे पथक खासदार संजय सिंह यांच्या घरी धडकले. तब्बल दहा तास ईडीची छापेमारी सुरू होती.  ईडी अधिकाऱयांनी संजय सिंह यांची चौकशी केली. घरामधील कागदपत्रांचीही तपासणी केली. सायंकाळी 7च्या सुमारास संजय सिंह यांना अटक करण्यात आली आहे. उद्या (दि. 5) संजय सिंह यांना विशेष न्यायालयात हजर करण्यात येईल.

दिल्लीत आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार आहे. 2021 मध्ये आप सरकारने नवीन अबकारी धोरण आणले. यावेळी मद्य दुकानांचे परवाने वाटपात घोटाळा झाल्याचा भाजपचा आरोप आहे. या आरोपावरून सीबीआय आणि ईडीने तपास केला आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली. सध्या सिसोदिया तुरुंगात आहेत. ईडीने सिसोदियांसंदर्भात दाखल केलेल्या आरोपपत्रात खासदार संजय सिंह यांचेही नाव आहे. त्यानंतर आज त्यांना अटक करण्यात आली.

संजय सिंह यांनी सातत्याने राज्यसभेत आणि संसदेबाहेर अदानी प्रकरणाचा मुद्दा उचलून धरला. त्यामुळेच ईडीने त्यांच्या घरावर छापेमारी करीत अटक केली. मात्र, ईडीला यापूर्वीही काही सापडले नव्हते आणि आताही काही मिळणार नाही, अशी प्रतिक्रिया आपने दिली आहे.

मोदी स्वतंत्र हिंदुस्थानातील सर्वात भ्रष्ट पंतप्रधान -केजरीवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भ्रष्टाचारांविरुद्ध संसदेत आणि संसदेबाहेर आवाज उठवणारे संजय सिंह हे सर्वात बुलंद नेते आहेत. धाड मारूनही ईडीला काहीच मिळाले नाही. उलट मला तर वाटते, मोदी हे स्वतंत्र हिंदुस्थानातील सर्वात भ्रष्ट पंतप्रधान आहेत. उद्या केंद्रात भाजपचे सरकार नसेल त्या वेळी तपास केल्यावर कळेल की, भाजपवाल्यांनी किती भ्रष्टाचार केला आहे, असा संताप दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला.

मरना मंजूर है, डरना नहीं! अटकेनंतर संजय सिंह यांची गर्जना

ईडीने अटक केल्यानंतर संजय सिंह यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत  त्यांनी मोदी सरकारला ठणकावले आहे. आज अचानक माझ्या घरी ईडी पोहोचली. दिवसभर छापेमारी करूनही काहीच नाही मिळाले. तरीही मला बळजबरीने अटक केली जात आहे. परंतु, मी आम आदमी पार्टीचा सैनिक आहे. जगात ज्या ज्यावेळी अत्याचार वाढतो त्या त्यावेळी जनतेचा आवाज बुलंद होतो. माझ्यावर कितीही कारवाया केल्या तरी मी घाबरणाऱयांपैकी नाही. ‘मरना मंजूर है, लेकीन डरना नहीं’, अन्यायाच्या विरोधात याआधीही बोललो आहे. यापुढेही बोलत राहीन, असे  ते म्हणाले.