एनडीएला आणखी एक हादरा, प्रसिद्ध अभिनेत्याने सोडली साथ

अभिनेता आणि आंध्र प्रदेशातील ‘जनसेना’ या पक्षाचे प्रमुख पवन कल्याण यांनी एनडीएला रामराम ठोकला आहे. तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांना कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. सध्या नायडू यांच्यासाठी कठीण काळ सुरू असून या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहणे हे मी माझे कर्तव्य समजतो असे म्हणत पवन कल्याण याने तेलुगू देसम पक्षाला पाठिंबा दिला आहे. पवन कल्याण याने कृष्णा जिल्ह्यात घेतलेल्या एका जाहीर सभेत म्हटले की जर जनसेना पक्ष आणि तेलुगू देसम पक्ष एक आले तर सत्ताधारी वायएसआर काँग्रेसचे अस्तित्वच उरणार नाही.

पवन कल्याण याने एनडीएच्या 18 जुलै रोजी झालेल्या बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीनंतर त्याने आपला मोदी यांच्या नेतृत्वाला पूर्ण पाठिंबा असल्याचे म्हटले होते. मोदी यांच्या स्वप्नातील हिंदुस्थान घडविण्यासाठी आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा असेल असे त्याने जाहीर केले होते. पवन कल्याण याने त्यावेळी जनसेना पक्ष, तेदुप आणि भाजप अशी आघाडी करण्याचाही प्रस्ताव मांडला होता, मात्र भाजपने त्यावर कोणताही निर्णय घेतला नव्हता. नायडू यांना अटक झाल्यानंतर पवन कल्याण याने त्याचा निर्णय बदलला असून त्याने एनडीएला सोडचिठ्ठी दिली आहे. नायडू यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून या प्रकरणाची पुढील सुनावणी 5 ऑक्टोबर म्हणजे आज होणार आहे.

नायडू यांना कोट्यवधींच्या कौशल्य विकास घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. त्यांना 9 सप्टेंबरला अटक करण्यात आली होती. या अटकेनंतर तिथलं राजकीय वातावरण ढवळून निघालं असून तेलगू देसम पक्षाने मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी हे विरोधकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून बदल्याचे राजकारण करत असल्याचा आरोप तेलुगू देसम पक्षाचे सरचिटणी नारा लोकेश यांनी केला आहे.