महावितरणच्या स्मार्ट मीटरमध्ये अदानीचा शिरकाव! 13 हजार कोटी रुपयांचे काम मिळवले

केंद्राच्या ‘आरडीएसएस’ योजनेंतर्गत महातिरण आपल्या राज्यभरातील जवळपास सवादोन कोटी वीज ग्राहकाकडे स्मार्ट मीटर बसवणार असून त्यावर तब्बल 26 हजार 900 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. यामध्ये अदानी कंपनीने शिरकाव केला असून भांडुप, कल्याण, कोकण आणि बारामती, पुणे झोनमध्ये जवळपास एक कोटी 15 लाख मीटर बसवण्याचे 13 हजार 888 कोटी रुपयांचे काम मिळाले आहे. अदानी कंपनीला बेस्टनंतर महावितरणच्या वीज वितरण क्षेत्रात मोठे काम मिळाल्याने वीज कामगारांसह सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

महावितरणने राज्याभरातील आपल्या वीज ग्राहकांचे सर्वसाधारण डिजिटल मीटर काढून स्मार्ट मीटर बसवण्याबाबत एजन्सी नेमण्याकरिता नुकत्याच निविदा काढल्या होत्या. त्यामध्ये वेगवेगळय़ा झोनसाठी सात कंपन्यांच्या निविदा आल्या होत्या. त्यापैकी अदानी, एनसीसी, मॉनटेसेलटो, आणि जिनियस या कंपन्यांना वेगवेगळय़ा झोनमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याचे काम दिले आहे.

– भांडुप, कल्याण आणि कोकण या झोनमध्ये 63 लाख स्मार्ट वीज मीटर बसवण्याचे काम अदानी या कंपनीला दिले असून त्यावर जवळपास 7594 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
– बारामती आणि पुणे झोनमधील 52 लाख 45 हजार स्मार्ट मीटर बसवण्याचे काम अदानी कंपनीला दिले असून त्यावर 6294 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.
– नाशिक आणि जळगाव झोनमध्ये 28 लाख 86 हजार स्मार्ट मीटर बसवण्याचे काम एनसीसी कंपनीला दिले असून त्याचा खर्च 3461 कोटी रुपये असणार आहे.
– लातूर, नांदेड आणि संभाजीनगर झोनमध्ये 27 लाख 77 हजार स्मार्ट मीटर बसवण्याचे काम एनसीसी कंपनीला दिले असन त्यावर 3330 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे.
– अकोला आणि अमरावती झोनमध्ये 21 लाख 76 हजार स्मार्ट मीटर बसवण्याचे काम जिनियस कंपनीला दिले असून त्याचा एकूण खर्च 2607 कोटी रुपये असणार आहे.