मुंबईत 25 हजार ठिकाणी डेंग्यू, अडीच हजार ठिकाणी मलेरिया

मुंबईत पालिका पावसाळापूर्व कामे वेगाने करीत असताना डेंग्यू आणि मलेरियाही दबा धरून बसला असल्याचे समोर आले आहे. कीटकनाशक विभागाने जानेवारीपासून आतापर्यंत केलेल्या कारवाईत तब्बल 24 हजार 742 ठिकाणी डेंग्यूचा निर्माण करणारा ‘एडीस’ तर 2 हजार 459 ठिकाणी मलेरिया निर्माण करणार ‘अॅनोफिलीस’ डास आढळला असल्याचे समोर आले आहे. डेंग्यू, मलेरिया निर्माण करणारी ठिकाणे पालिकेच्या कीटकनाशक विभागाने नष्ट केली.  शिवाय विविध संस्थांच्या परिसरात 22 हजार 568 पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्यात आल्या असून 6 हजार 451 टाक्यांच्या ठिकाणी उपाययोजना बाकी असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून नष्ट होईल.

पालिकेच्या माध्यमातून पावसाळापूर्व कामे वेगाने सुरू असून आज पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी कीटकनाशक विभागाकडून सुरू असलेल्या डास प्रतिबंधक कामाचा आढावा घेतला.  विविध संस्थांच्या परिसरात पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक करण्याची कार्यवाही 15 मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले. तसेच विभाग पातळीवर विविध यंत्रणांनी सक्रियपणे सहभागी होत महानगरपालिकेसोबत डास उत्पत्ती स्थानांची संयुक्त शोधमोहीम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणांना दिल्या, तर कर्तव्यात कसूर करणाऱया संबंधितांवर कठोर कार्यवाही करण्याचे निर्देश महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी यावेळी दिले. कीटकनाशक अधिकारी चेतन चौबळ यांनी सादरीकरण करून डास निर्मूलनासाठी करण्यात येणाऱया उपाययोजनांची माहिती दिली.

2030 पर्यंत मलेरियामुक्तीचे उद्दिष्ट

मुंबईत शासकीय-निमशासकीय अशा प्रकारच्या सुमारे 67 आस्थापना, संस्था आहेत. या ठिकाणी असणाऱया पाण्याच्या टाक्यांमध्ये डेंग्यू, मलेरियाच्या डासांची वाढ होऊन आजार वाढण्याची भीती असते. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या कीटकनाशक विभागाकडून या टाक्यांची तपासणी करून आवश्यक त्या ठिकाणी कीटकनाशक कारवाई करण्यात आली. यावेळी विभागीय पातळीवर व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करून विभागातील संबंधित यंत्रणांना सहभागी करून संयुक्त मोहीम राबवावी असे निर्देश अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी दिली. दरम्यान, शाश्वत विकास ध्येय 3.3 अंतर्गत 2030 पर्यंत मलेरियामुक्त असे अभियान देशपातळीवर राबवण्यात येत आहे.

 अशी घ्या काळजी

z पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉईड, कॉलरा, कावीळ असे आजार तर कीटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात.

z त्यामुळे हे पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेने केले आहे.