विरोध करणारे सत्तेतून दूर झाल्यावर नगर जिल्हा विभाजन मार्गी लागेल, आमदार राम शिंदे यांचा पालकमंत्री विखे यांना टोला

नगर जिह्याचे विभाजन करायचे नाही, असे ज्यांच्या मनात आहे ‘ते’ सत्तेतून दूर झाल्यावरच विभाजनाचा प्रश्न ऐरणीवर येऊन मार्गी लागेल, असा टोला भाजपचे आमदार प्रा. राम शिंदे यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे नाव न घेता लगावला.

जिल्हाधिकारी कार्यालयात आल्यानंतर आमदार राम शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. आमदार शिंदे म्हणाले, ‘औरंगाबाद’चे नामकरण छत्रपती संभाजीनगर व ‘उस्मानाबाद’चे नामकरण धाराशिव करण्याबाबत एक विशिष्ट वेळ व परिस्थिती निर्माण झाली होती. तशी स्थिती नगर जिल्हा विभाजनाबाबत मी पालकमंत्री असताना झाली होती. मात्र, त्यावेळी निर्णय झाला नाही. आता ज्यांच्या मनात नगर जिह्याचे विभाजन करायचे नाही, ‘ते’ सत्तेपासून दूर गेल्यानंतर विभाजनाचा प्रश्न ऐरणीवर येऊन तो मार्गी लागेल, असा टोला पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे नाव न घेता लगावला. दरम्यान, जसा जिल्हा नामकरणाचा प्रश्न सुटला, तसा जिल्हा विभाजनाचा प्रश्नही सुटेल,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा विभाजनाच्या मुद्दय़ावर सर्वांनी एकत्र येऊन पाठिंबा देऊन निर्णय करण्याची आवश्यकता आहे, असा सूर निघतो आहे. शिवाय ही जनतेची भावना आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे, असे सूचक वक्तव्यही आमदार शिंदे यांनी केले. दरम्यान, रत्नागिरी, ठाणे, परभणी या जिह्यांचे विभाजन होत असताना नगर जिह्याचे का होत नाही, असा प्रश्न सर्वसामान्यांसमोर आहे, असेही ते म्हणाले.