भरपावसात 10 मिनिटांत अर्धा कि.मी. डांबरीकरण! नगरमध्ये ठेकेदाराचा कारनामा; नागरिकांनी केली पोलखोल

भरपावसात रात्रीची संधी साधून अवघ्या 10 मिनिटांत तब्बल अर्धा कि.मी. रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा कारनामा नगर महापालिकेच्या ठेकेदाराने केला आहे. रस्त्याचे काम सुरू असताना जागरूक नागरिकांनी धाव घेत बोगस कामाची पोलखोल केली. तसेच याबाबत जाब विचारत ठेकेदाराच्या सुपरवायझरचा हार घालून सत्कार करत काम बंद पाडले.

दरम्यान, बोगस आणि निकृष्ट दर्जाचे काम करणाऱया संबंधित ठेकेदाराचे बिल अदा करू नये तसेच या कामाची चौकशी करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. याबाबत उद्या जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना निवेदन देण्यात येणार आहे.

शहरातील लक्ष्मी कारंजा ते सांगळेगल्ली कोपरा अशा 500 मीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम महापालिकेच्या ठेकेदाराने रात्री संधी साधून भरपावसात उरकून घेतले. राज्य शासनाने डांबरीकरणाची कामे 1 जून ते 30 सप्टेंबरपर्यंत करू नयेत, असे स्पष्टपणे शासकीय यंत्रणांना बजावलेले आहे. असे असताना महापालिकेने लक्ष्मीकारंजा येथे दिवसाऐवजी रात्रीच्यावेळी आणि तेही पाऊस सुरू असताना, डांबरीकरणाचे काम सुरू केले. अवघ्या 10 मिनिटांतच 500 मीटर रस्त्यावर डांबरमिश्रीत खडी अंथरुण काम उरकण्यात आले.

हे काम सुरू असताना, जागरूक नगरकरांनी धाव घेत जाब विचारला. यावेळी सदर काम अत्यंत निकृष्ट आणि बोगस असल्याचे निदर्शनास आले. अंथरलेली डांबरमिश्रीत खडी हाताने, पायाने विखुरली जात होती. वाहने त्यावरून जात असताना, टायरला चिटकून रस्ता उखडत असल्याचे दिसून आले. पावसात डांबर कधीही रस्त्याला धरत नाही. त्यामुळे झालेला रस्ता लगेचच उखडला जात होता. याबाबत ठेकेदाराच्या सुपरवायझरकडे नागरिकांनी जाब विचारला. सुपरवायझर ठोस काहीही माहिती देत नसल्याचे पाहून नागरिकांनी गांधीगिरी करत सुपरवायझरला हार घालून सदरचे काम बंद पाडले.

सदर काम मोहरम मिरवणूक मार्गावर असल्याचे सांगून ठेकेदाराने टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला. मोहरम मार्गावरचे केवळ खड्डे बुजविण्याचे काम करणे आवश्यक असताना मोहरमच्या नावाखाली रस्त्याचे सरसकट डांबरीकरण करून बिल काढून घेण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे या कामाची चौकशी करून ठेकेदाराला बिल अदा करू नये, अशी नागरिकांनी मागणी केली. या संदर्भात आज (दि. 18) जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल भंडारी यांनी दिली. यावेळी सचिन धाडगे, देवेंद्र देशमुख, साहील पवार आदी उपस्थित होते.