राज्य सरकारच्या आदेशाला नगर जिल्हा बँकेने फासला हरताळ; पीक कर्ज वसुली विरोधात शेतकरी, शिवसैनिकांचे ठिय्या आंदोलन

भाजपच्या अधिपत्याखाली असलेल्या नगर जिल्हा सहकारी बॅंकेचा मनमानी कारभार उघडकीस आला आहे. शेतकऱ्यांकडून पीक कर्जाचे पैसे न घेण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. पण राज्य सरकाच्या आदेशाचे उल्लंघन करून सर्रासपणे शेतकऱ्यांकडून पीक कर्जाचे लाखो रुपये घेतले जात आहेत. त्यामुळे बँकेच्या मनमानी कारभाराविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे.

जिल्हा बँकेचे पीक कर्ज वेळेत भरून शुन्य टक्के व्याजदराचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले 4 मार्च रोजी म्हणाले होते. नगर जिल्हा बँक ही नेहमीच शेतकरी हिताचे निर्णय घेण्यासाठी ओळखली जाते. चालु वर्षामध्ये आज अखेरपर्यंत अल्पमुदत शेती कर्जा करिता 3,211 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. जिल्हा बँकेच्या वतीने आयोजित वि.का.से सोसायटीचे सचिव, जिल्हा बँक शाखाधिकारी, वसुली अधिकारी यांची संयुक्त कर्ज वसुली आढावा बैठक नगर येथील यशवंतराव चव्हाण सहकार सभागृह येथे आयोजित करण्यात आली होती. “31 मार्च 2024 अखेर वसुलीस पात्र कर्जाची रक्कम कर्जदार शेतकऱ्यांनी वेळेत भरावी आणि 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जास शुन्य टक्के व्याजदराचा फायदा शेतकऱ्यांनी घ्यावा,” असे आवाहन बैठकीमध्ये बँकेचे चेअरमन माजी मंत्री  शिवाजीराव कर्डिले यांनी केले होते.

“महाराष्ट्र शासनाने पीक कर्ज वसुलीला स्थगिती दिली असली तरी शासनाने या कर्जाचे पूनर्गठण करून देण्याबाबत सुचना केल्या आहेत. परंतु अशा प्रकारच्या कर्जाचे पुनर्गठण केल्यास पुनर्गठण तारखेपासून या कर्जाचा व्याजदार हा 11 टक्के होईल. हा व्याजदर शेतकऱ्यांना परवडणारा नसल्यामुळे शेतकऱ्यांनी आपले कर्ज 31 मार्च 2024 पूर्वी भरावे आणि शुन्य टक्क्याचा लाभ घ्यावा. या मुदतीमध्ये जे शेतकरी कर्ज भरतील त्यांना 10 एप्रिलच्या आत पुन्हा पिक कर्ज जिल्हा बँक देणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नियमीत कर्जदार म्हणून याचा फायदा घ्यावा,” असे आवाहन बँकेचे अध्यक्ष शिवजीराव कर्डिले यांनी केले होते.

बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले यांनी केलेल्या आवाहनामुळे शेतकऱ्यांना शून्य टक्के दराचा लाभ मिळेल, अशी आशा होती. मात्र नगर जिल्हा सहकारी बँकेने राज्य सरकारच्या नियमाला हरताळ फासला आहे. सर्रासपणे व्याजाची रक्कम भरून घेतली जात आहे. विशेष म्हणजे नगर जिल्हा सहकारी बँक ही भाजपच्या ताब्यात आहे. त्यामुळेच बँकेच्या कारभारावर चहुबाजूंनी टीका केली जात आहे. त्यामुळे संतप्त शिवसैनिकांनी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष कार्ले, माजी सभापती रामदास भोर, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाळासाहेब हराळ यांच्या नेतृत्वात जिल्हा उपनिबंधक यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले.

“14 मार्च रोजी व पुन्हा 27 मार्चला निबंधक कार्यालयातून पत्र देऊन शेतकऱ्यांकडून व्याज घेऊ नका, असे स्पष्ट सांगण्यात आले आहे. असे असताना वास्तविक शुन्य टक्के दराने पैसे भरून घेतले जातील, असे जाहीर केले. मात्र तसे न करता शेतकऱ्यांना पीक कर्ज भरताना त्यांना 6 टक्के व्याज लावलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना व्याजाची अतिरिक्त रक्कम भरणे परवडत नाही. बँकेने ऐनवेळेला निर्णय घेऊनही त्याची अंमलबजावणी होत नाही. म्हणून आम्ही बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वरपे यांच्याशी संपर्क साधला होता. त्यांनी यावर बोलण्यास नकार देत ही बाब चेअरमन यांच्याकडे असल्याचे सांगितले. त्यानंतर जिल्हा उपनिबंधक गणेशपुरी यांच्याशी संपर्क करून त्यांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर कोणताही निर्णय घेतला नाही,” असे संतोष कार्ले यांनी सांगितले. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी व शेतकऱ्यांनी उपनिबंधक यांच्या दालनासमोर आंदोलन सुरू केले आहे.