भाजप पदाधिकाऱ्यांची मनधरणी करण्याची वेळ स्टार प्रचारकांवर आली

bjp logo flag

महायुतीचे स्टार प्रचारक असलेले राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे गेल्या काही दिवसांपासून मुलाच्या विजयासाठी नगर जिह्यामध्ये तळ ठोकून बसले आहेत. नगरची निवडणूक सोपी राहिलेली नाही, अशी चर्चा भाजप वर्तुळातच सुरू आहे. दुसरीकडे अंतर्गत वादातून भाजप पदाधिकाऱयांनी सामूहिक राजीनामे देण्यास सुरुवात केल्यामुळे त्यांची मनधरणी करण्याची वेळ आता स्टार प्रचारकांवर आली आहे.

भाजपने पहिल्या यादीतच नगर दक्षिणची जागा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे पुत्र खासदार सुजय विखे यांना जाहीर केली. त्यानंतर नगर जिह्यात भाजपमध्ये अंतर्गत नाराजीनाटय़ सुरू झाले. आमदार राम शिंदे यांची असलेली नाराजी दूर करण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मदत घ्यावी लागली, तेव्हापासूनच नगर भाजपमध्ये सर्वकाही आलबेल आहे, असे वातावरण नसल्याचेच दिसून येत आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत नगरमध्ये जे पाडापाडीचे राजकारण झाले, त्याला खासदार सुजय विखे जबाबदार असल्याचे पत्र भाजपाच्या माजी आमदारांनी भाजप प्रदेशाध्यक्षांना दिले होते. त्यावेळची नाराजी आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. आता कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपाला नगरची जागा जिंकायची असल्यामुळे आणि समोर महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नीलेश लंके असल्यामुळे भाजपची मोठी गोची झाली आहे. खासदार सुजय विखे यांच्या प्रचारामध्ये अद्यापही भाजपाचे महत्त्वाचे पदाधिकारी उतरलेले नाहीत. त्यामुळे नाराजी आजही कायम असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे हे नगर जिह्यामध्ये तळ ठोकून बसले आहेत. त्यांनी भाजप पदाधिकाऱयांची मनधरणी करत बसण्यापेक्षा स्वतःची यंत्रणा कामाला लावली आहे. प्रत्येक गोष्टीवर ते लक्ष ठेवून आहेत. पदाधिकाऱयांची नाराजी दूर करण्यासाठी त्यांनी बैठकांचा सपाटाच सुरू ठेवला आहे.

कोणाला नगर शहरामध्ये ठेवायचे, कोणाला श्रीगोंद्याला पाठवायचे, तर कोणाला इतर तालुक्यांत पाठवायचे याचे नियोजन गाडी-घोडय़ासह करण्यात येत आहे. याची जोरदार चर्चा भाजप वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे मात्र सुजय विखे यांच्यावर असलेली नाराजी आजही कायम आहे. पदाधिकारी काम करायला तयार नाहीत व कार्यकर्तेसुद्धा फिरकत नसल्यामुळे विखेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांवर आरोप-प्रत्यारोप करून निवडणुकीवरचे लक्ष हटविण्याचे उद्योग सध्या भाजपाकडून म्हणजेच विखे यांच्याकडून केले जात आहेत. भाजपने जाहीर केलेले स्टार प्रचारक महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे अनेक दिवसांपासून नगरमध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. त्यामुळे त्यांना ही निवडणूक सोपी राहिलेली नाही, हेच दिसून येत आहे.