विधानसभा अध्यक्ष न्याय देण्याऐवजी राजकीय पद्धतीने वागत आहेत – अंबादास दानवे

‘विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. विधानसभा अध्यक्ष हे पद संवैधानिक असून, अध्यक्ष न्याय देण्याऐवजी राजकीय दृष्टीने काम करीत आहेत. ही धूळफेक जनता पाहत असून, योग्य वेळी त्यांना योग्य उत्तर देईल,’ असा हल्लाबोल विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केले. ‘सर्व क्षेत्रांमध्ये खासगीकरणाचे वारे वाहत असून, हे वारे शिक्षणक्षेत्रात वाहिले तर मोठे संकट उभे राहील. त्यामुळे शाळांचे खासगीकरण योग्य नाही,’ असेही दानवे यांनी सांगितले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम, युवासेनेचे राज्य सचिव विक्रम राठोड यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

16 आमदारांच्या अपात्रतेवर सुनावणीस विलंब होत असल्याबाबत विचारले असता, दानवे म्हणाले, ‘याबाबत विधानसभा अध्यक्ष पक्षपातीपणा करीत असल्याचे दिसत आहे. हे पद संवैधानिक असून, विधानसभा अध्यक्ष न्याय देण्याऐवजी राजकीय दृष्टीने काम करीत आहेत.’ राज्य सरकारने जिल्हा परिषद व नगरपालिका शाळांना आता खासगीकरणाकडे नेण्यासाठी आदेश काढला आहे. याबाबत दानवे म्हणाले, काही क्षेत्रांमध्ये खासगीकरण सुरू आहे; पण शिक्षणक्षेत्रात सरकारने खासगीकरणाचे धोरण आणले असेल, तर ते चुकीचे आहे. या धोरणामुळे गरिबांची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली. ‘काही ठिकाणी शाळा कमी-अधिक प्रमाणात चालत असतील, याचा अर्थ त्यांचे खासगीकरण करायचे असा नाही,’ असेही दानवे म्हणाले.

‘सध्याचे सरकार हे लबाडांचे सरकार आहे. ते फक्त आश्वासनांची खिरापत वाटत आहेत. प्रत्यक्षात ती आश्वासने पूर्ण करण्यात येत नाहीत. त्यामुळे जनतेचा अपेक्षाभंग झाला आहे. त्यामुळे जनताच आता या सरकारचे विसर्जन करेल. नगरमध्ये शिवसैनिकांची मोठी ताकद आहे. त्यामुळे पुढील काळात स्थानिक स्वराज्य संस्थांवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा भगवा फडकेल,’ असा विश्वासही अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.