…याबाबत बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही; अंबादास दानवेंनी आशिष शेलारांना सुनावले

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गावरील टोलनाक्यावरून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. त्यावर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी पलटवार केला आहे. तर त्याला विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील टोलनाके बंद करण्याची मागणी केली आहे.

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्ग राज्य सरकारने महापालिकेला हस्तांतरीत केले आहेत. पालिका त्यांची डागडुजी आणि देखभाल करीत आहे. या मार्गावरील टोल आणि जाहिरातींचा महसूल रस्ते विकास महामंडळ जमा करीत आहे. त्यामुळे मुंबईकरांना मालमत्ता कर व पथकर असा दुहेरी भुर्दंड पडत असल्याने टोला नाके बंद करा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारकडे केली. यावर आशिष शेलार ट्वीट करत ते मुंबईकरांच्या कैवाराचे सोंग करत आहेत, अशी टीका केली. त्याला अंबादास दानवे यांनी सडतोड प्रत्युत्तर दिले आहे.

अंबादास दानवे यांनी म्हटले की, काय तो साक्षात्कार आशिष शेलार तुमचा! शिवसेना मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या बाकावर बसलेली असताना तुम्ही आणि तुमचा जगातील सर्वात मोठा पक्ष काय डोळे लावून ध्यान करत होतात का? सत्तेत भागीदारी घेऊन पुन्हा हे बोलण्याचा नैतिक अधिकार तुम्हाला नाही. मुंबई कोण लुटतंय हे मुंबईकर पाहतो आहेच! ज्या प्रकारे मुंबईकरांच्या ठेवी ‘उडवल्या’ जात आहेत, त्यावरून मुंबईकरांना काही सांगायची गरज नाही, अशा शब्दांत अंबादास दानवेंनी शेलारांना सुनावले आहे.