…. अशी विधाने ऐकताने ते बधिर होतात, अंबादास दानवे यांचा बावनकुळे व फडणवीसांवर हल्लाबोल

कॅबिनेट मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी महिलांबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ”मासे खाल्ले की बाईमाणूस चिकनी दिसायला लागते” असे विचित्र वक्तव्य करत त्यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. धुळे जिल्ह्यातील अंतुर्ली येथे एका जाहीर कार्यक्रमामध्ये बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

”वाचाळवीरांच्या पंगतीत अजून एक नाव आता मंत्री विजयकुमार गावित यांचे लागले आहे. महापुरुषांची बदनामी करण्यात कोणतीही कसर न सोडणाऱ्या भाजप नेत्यांना अभय मिळाले म्हणूनच आता महिलांवरही यांची जीभ घसरू लागली आहे. भक्त आणि उठसुठ शिवसेनेवर तोंडसुख घेणाऱ्या भाजपच्या प्रत्येकवेळी महिला अत्याचारावर (सोयीस्कर) भूमिका घेणाऱ्या मंडळींचे कान मात्र असली विधाने ऐकताना बधिर होतात. बरोबर ना?” असा सवाल त्यांनी चंद्रशेखर बावनकुळे व देवेंद्र फडणवीस यांना केला आहे.

मासे खाण्याचे दोन फायदे आहेत. मासे खाल्ले की माणूस म्हणजे बाईमाणूस चिकनी दिसायला लागतात. डोळे तरतरीत होतात. कोणीही बघितले तरी पटवूनच घेणार, असे गावित म्हणाले. पुढे त्यांनी उपस्थितांना विचारले की, कोणी ऐश्वर्या राय बघितली काय? काय रे सांगितले की नाही ऐश्वर्या राय. ती समुद्राच्या किनारी, बंगळुरुची राहणारी. ती दररोज मासे खायची. दररोज मासे खाल्ल्यामुळेच तिचे डोळे सुंदर आहेत. तुमचेही तसेच होणार. आणखी एक फायदा म्हणजे आपली जी त्वचा असते ती मासे खाल्ल्यामुळे चांगली दिसते. माशांमधये एक प्रकारचे तेल असते, त्या तेलामुळे डोळ्यांवर परिणाम होतो आणि माशाच्या तेलामुळे शरिराची त्वचाही चांगली दिसते, असेही गावित म्हणाले.