कश्मीरातील हल्ले थांबले नाही तर पुन्हा ‘सर्जिकल स्ट्राईक, गृहमंत्री अमित शहा यांचा पाकिस्तानला इशारा

जम्मू-कश्मीरातील दहशतवादी हल्ले आणि घुसखोरी थांबली नाही तर हिंदुस्थानकडून पुन्हा सर्जिकल स्ट्राईक केला जाईल, असा थेटच इशारा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पाकिस्तानला दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून कश्मीर खोऱयात दहशतवादी हल्ले वाढले आहेत. दहा दिवसांत एका कश्मिरी पंडितासह पाच निरपराध नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तसेच सीमेवर पाकिस्तानी दहशतवाद्यांची घुसखोरी सुरू आहे. पाक सैन्याकडून शस्त्र्ासंधीचे उल्लंघन वाढले आहे. दोन दिवसांपूर्वी पूंछ जिल्हय़ात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत पाच जवान शहीद झाले. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अमित शहा यांनी नाव न घेता पाकिस्तानला इशारा दिला आहे. तसेच 29 सप्टेंबर 2016 रोजी हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तानात घुसून केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची आठवण करून दिली आहे. गोव्यात धारबंदोरा येथील राष्ट्रीय न्यायवैधक विज्ञान विद्यापीठाच्या भूमिपूजन कार्यक्रमात गृहमंत्री शहा बोलत होते.

कश्मीरातील नागरिकांच्या हत्येसाठी दहशतवाद्यांना मदत करणे थांबविले पाहिजे. आमच्या नागरिकांवर हल्ले कोणीही खपवून घेणार नाही. यापूर्वी हिंदुस्थानने सर्जिकल स्ट्राईक करून हे सिद्ध केले आहे. त्यामुळे तुम्ही कश्मीरातील हल्ले थांबविले नाहीत तर आम्ही आणखी सर्जिकल स्ट्राईक करू, असे शहा यांनी सांगितले.

आता चर्चेची वेळ राहिली नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दिवंगत माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले सर्जिकल स्ट्राईक हे महत्त्वाचे पाऊल होते. हिंदुस्थानच्या सीमांवरील शांतता कोणीही भंग करू शकत नाही हाच संदेश सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून दिला होता. दोन्ही देशांमध्ये चर्चेची एक वेळ होती. पण आता ती वेळ राहिली नाही. आता जशास तसे उत्तर देण्याची वेळ आली आहे, असे गृहमंत्री शहा म्हणाले.