नितेश राणे यांना ‘सागर’ बंगल्याची भीती, आम्हाला नाही!

प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांच्यावर टीका करताना बच्चू कडू नावाचे वादळ आमच्या ‘सागर’ बंगल्यात शमवले जाईल, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता. त्यावर बच्चू कडूंचा राजकारणात कोणी बाप नाही. ‘सागर’ बंगल्याची भीती नितेश राणेंना असेल, आम्हाला नाही, असे बच्चू कडू यांनी सुनावले आहे.

महायुतीला निवडणुकीत जागा आणि उमेदवारांचा काहीही फायदा न देणारे पण फक्त विरोधकांवर टीकाटिप्पणी करण्यासाठी इतर पक्षांमधून गोळा केलेल्या नेत्यांची फौज भाजपने उभी केली आहे. अमरावती लोकसभा निवडणुकीवरून महायुतीत बाहेर पडून खासदार नवनीत राणांविरोधात प्रहारचा उमेदवार उभे करणाऱया बच्चू कडू यांच्याविरोधात आमदार नितेश राणे यांनी टीका केली होती. त्याला बच्चू कडू यांनी जोरदार उत्तर दिले आहे.

आमचा नेता मुंबई, दिल्लीत बसलेला नाही!

खरे तर नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे. बच्चू कडू 20 वर्षे अपक्ष लढत आहे. ना झेंडा आहे, ना नेता आहे. आमचा नेता मुंबई, दिल्लीत बसलेला नाही. आमचा नेता गावात बसलेला आहे, अशा शब्दांत बच्चू कडू यांनी नितेश राणे यांना सुनावले.

मी हलक्या कानाचा नाही!

भाजप हा फार मोठा पक्ष आहे. मी अमरावतीत उमेदवार दिल्याने एवढय़ा मोठय़ा पक्षावर फार फरक पडणार नाही. नितेश राणेंसारखा मी हलक्या कानाचा नाही. बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही. त्यांचा बाप असू शकतो, माझा नाही. आमचा बाप शेतमजूर आहे. कुणाचा पह्न आला, काही झालं तरी आम्ही माघार घेणार नाही, असा हल्ला कडू यांनी चढवला.