महाविकास आघाडीचे नीलेश लंके यांचा अर्ज दाखल

महाविकास आघाडीचे नगर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार नीलेश लंके यांनी आज दिव्यांग यांच्या समवेत तसेच महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱयांच्या उपस्थितीमध्ये साध्या पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी केली होती. ‘कोण आला रे कोण आला, दक्षिणेचा वाघ आला’, ‘राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी’, अशी घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी नीलेश लंके यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे, जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, आमदार प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाप्रमुख जयंत वाघ, युवासेनेचे विक्रम राठोड, प्रताप ढाकणे, शहरप्रमुख संभाजी कदम, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष किरण काळे यांच्यासह शेतकरी संघटनेचे व दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर नीलेश लंके म्हणाले, आज हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गावागावांमध्ये हनुमान जयंतीचा उत्सव साजरा होत आहे. तसेच सध्या प्रचंड ऊन आहे. आपण शक्तिप्रदर्शन करीत अर्ज दाखल केला असता तर याचा नागरिकांना त्रास झाला असता. हा त्रास होऊ नये म्हणूनच साध्या पद्धतीने अर्ज दाखल करण्याची भूमिका घेतली, असे लंके यांनी सांगितले.

नगर जिह्यात मोठय़ा प्रमाणात गुंडगिरी वाढत आहे. आपल्याला ही गुंडगिरी मोडीत काढायची आहे. नगरच्या विकासाचा थांबलेला रथ आगामी काळात वेगाने पुढे न्यायचा आहे. त्यादृष्टीने आपण ही निवडणूक लढायची आहे, असे सांगत लंके म्हणाले, विरोधक गर्दीबाबत आरोप करत आहेत. मात्र, आम्हाला गर्दी करायची असती तर गर्दी काय असते हे आम्ही त्यांना दाखवून दिले असते. मात्र, नागरिकांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही, असे त्यांनी सांगितले. काल विखे यांनी जमविलेली गर्दी पाहता त्यांचे खायचे दात वेगळे व दाखवायचे दात वेगळे आहेत हे दिसून आले. नगरची निवडणूक ही धनशक्ती विरुद्ध सामान्य व्यक्ती अशी असून, नगरची जनता सुज्ञ आहे, असे लंके यांनी सांगितले.

‘ते’ बळाचा वापर करतील

विखेंच्या हातात सत्ता आहे. त्यामुळे ते निवडणुकीमध्ये सत्तेचा वापर करतील, हे मी पूर्वीच सांगितले आहे. त्यांच्याकडे विकासाचे कोणतेच मुद्दे राहिलेले नाहीत. त्यामुळे ते आता वेगवेगळे मुद्दे काढून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवू पाहत आहेत. यापूर्वी त्यांनी माझ्या इंग्रजीचा मुद्दा काढला, त्यानंतर गुंडगिरीचा, उद्या ते चारित्र्याचा मुद्दासुद्धा बाहेर काढतील, अशी भीतीही लंके यानी व्यक्त केली. आता मी मात्र जनतेमध्ये जाऊन नगरकरांच्या अडचणी समजून घेणार आहे. आगामी काळात त्याबाबत काय अंमलबजावणी करता येईल याचा अभ्यास करणार आहे, असे लंके यांनी सांगितले.

2019 च्या तुलनेत नीलेश लंके यांची संपत्ती घटली, कर्ज वाढले

महाविकास आघाडीचे उमेदवार नीलेश लंके यांची सन 2019च्या तुलनेत स्थावर आणि जंगम मालमत्ता घटली असून, त्यांच्यावरील कर्जामध्ये वाढ झाली आहे. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींच्या मालमत्तेत पाच वर्षांच्या कालावधीमध्ये प्रचंड वाढ होत असताना लंके यांची झोळी मात्र रिकामीच असल्याचे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रावरून स्पष्ट झाले.

नीलेश लंके यांनी सन 2019मध्ये विधानसभेची निवडणूक लढविली. त्यावेळी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची स्थावर मालमत्ता 15 लाख 35 हजार 153 रुपये इतकी होती, तर जंगम मालमत्ता 58 लाख 56 हजार 521 इतकी होती. सन 2019मध्ये त्यांच्यावर 32 लाख 28 हजार 989 रुपयांचे कर्ज होते. आता सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात त्यांची स्थावर मालमत्ता सुमारे चार लाखांनी वाढली आहे. जंगम मालमत्तेमध्ये कमालीची घट झाल्याचे दिसून येते. सन 2024मध्ये लंके यांच्या जंगम मालमत्तेsत 35 लाख 24 हजार 295 रुपयांची घट झाली आहे, तर लंके यांच्यावरील कर्ज 37 लाख 48 हजार 757 इतके असून, सन 2019च्या तुलनेत ते वाढले आहे.

दरम्यान, कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा निर्यात सुरू करण्यासाठी लंके यांनी सुपा चौकात केलेल्या आंदोलनाबाबत त्यांच्यावर शेतकरी आंदोलनाचा गुन्हा दाखल आहे.