गुजरातच्या कंपनीने मुंबईत मराठी माणसाला नोकरी नाकारली! लिंक्डिनवरील जाहिरातीनंतर तीव्र संतापाची लाट

महाराष्ट्रातले उद्योग गुजरातमध्ये पळवले जात असतानाच एका गुजराती कंपनीने मुंबईत मराठी माणसाला नोकरी देण्यास नकार दिल्याने संताप निर्माण झाला आहे. या कंपनीने मुंबईतील पोस्टसाठी दिलेली जाहिरात व्हायरल झाली असून त्यात ‘मराठी माणसाला नो एन्ट्री’ असे नमूद करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे बहुसंख्य मराठी माणसे राहत असलेल्या गिरगावमधील कार्यालयासाठी या कंपनीला उमेदवार हवा आहे, पण तो मराठी नको आहे.

मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे. देशाची आर्थिक राजधानी आहे. परप्रांतातून लाखो लोक इथे नोकरीनिमित्त येतात. लाखो परप्रांतीय मुंबईत वास्तव्य करतात. मराठी ही महाराष्ट्राची राज्यभाषा आहे. त्यामुळे येथील नोकऱयांवर मराठी माणसाला प्राधान्य मिळाले पाहिजे. असे असतानाही जाहीररीत्या मराठी माणसाला नोकरी नाकारण्याचा उद्दामपणा करणाऱया या कंपनीविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

आयटी कोड इन्फोटेक असे या कंपनीचे नाव आहे. ही कंपनी गुजरातच्या सुरतमधील आहे. या कंपनीसाठी जान्हवी सराना या फ्रिलान्सर एचआर रिक्रूटरने लिंक्डिनवर ग्राफिक डिझाईनर या पोस्टसाठी जाहिरात दिली होती. मराठी उमेदवारांनी अर्ज करू नये, असे या जाहिरातीत नमूद करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. या मराठीद्वेष्टय़ा पोस्टविरोधात नेटकऱयांनी कमेंट करून तीव्र निषेध केला आहे.

हिसका बसताच कंपनीने मागितली माफी

व्हायरल झालेल्या जाहिरातीवर आलेल्या संतप्त कमेंट्स पाहून एचआरने तातडीने ती पोस्ट डिलिट करून टाकली आहे. मराठी माणूस भडकल्याची जाणीव होताच कंपनीने दुसरी पोस्ट करून माफीही मागितली आहे. ‘मी माफी मागते. काही दिवसांपूर्वी मी ग्राफिक्स डिझायनरच्या जागेसाठी जाहिरात केली होती. पण जाहिरातीतील एका वाक्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या आहेत. कोणत्याही भेदभावाला मी खतपाणी घालत नाही,’ असे सराना हिने नमूद केले आहे.