हृतिक रोशन… बाॅलीवूडचा ग्रीक गाॅड आणि मिस्टर परफेक्शनिस्ट!

>> प्रिया भोसले

2000 साली आलेल्या पहिल्या सिनेमात ‘कहो ना प्यार है’ मध्ये लोकांना हृतिक जसा दिसला तसा तो कधीच नव्हता. चाचरत बोलण्याचा, हडकुळ्या शरीरयष्टीचा, सहाव्या बोटाचा असे बरेच न्यूनगंड सोबत घेऊन होता. वडील राकेश रोशनच्या ‘खेल’ चित्रपटापासून त्याने कामाला सुरूवात केली. चित्रपटात येणं पक्कं होतं परंतु त्यासाठी त्याला त्याच्यात बरेच बदल घडवायचे होते. मग स्पीच थेरेपी, शरीरसौष्ठव, नृत्याचं प्रशिक्षण असं सगळं पूर्ण करत ‘कहो ना प्यार है’ मधून जलवा दाखवायला सिद्ध झाला. त्याचे, त्याच्या कुटुंबियांचे आडाखे चुकावेत इतका ‘कहो ना प्यार है’ सुपरहिट झाला आणि हृतिक? त्याला तर न भूतो न भविष्यतो अशी प्रसिद्धी लाभली.लहान मोठ्यांच्या गळ्यातला ताईत झाला.त्याच्या देखणेपणाची तर जगाने दखल घेतली.बेस्ट डेब्यू सोबत बेस्ट अॅक्टरचा अवाॅर्ड मिळाला. त्याची एक पल का जीना गाण्यातली डान्स स्टेप सिग्नेचर मुव्ह झाली. फक्त एक चित्रपट आणि आयुष्य बदलून गेलं. आईवडील स्टार असतील तर मुलांसाठी करीयरची सुरूवात तुलनेत सोपी असते. त्यांचं नाव घेऊन स्टारकिड्स सिनेक्षेत्रात उतरतात पण ह्रतिकने चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत रोशन नावाचा आधार घेतला असेल त्यानंतरच्या त्याच्या यशात त्याच्या व्यतिरिक्त कुणाचाही वाटा नव्हता.

त्याचा ‘कहो ना प्यार है’ माईलस्टोन ठरला. चेहऱ्यावरचे निरागस भाव बोलून दाखवणारे ते भावदर्शी डोळे, पहिला चित्रपट असूनही अभिनयात दिसणारा आत्मविश्वास आणि त्या नेत्रदीपक यशामुळे भल्या भल्या सुपरस्टार्सना असुरक्षित वाटू लागलं. इतकी प्रसिद्धी, इतकी लोकप्रियता मिळण्यासाठी इतर स्टार्संना जिथे सलग सुपरहिट चित्रपट द्यावे लागतात तिथे हृतिकला तेच यश फक्त एकट्या ‘कहो ना प्यार है’ ने दिलं.

अर्थात यशाची उंची गाठली की दुसरं टोकं खाली नेणारं अपयशाचं ही असतं त्यालाही ते चुकलं नाही. जितका तो लोकप्रिय झाला तितकंच नंतर त्याला अपयशाचाही सामना करावा लागला.

‘कहो ना प्यार है’ नंतर ‘मिशन कश्मीर’च्या आणि ‘कभी खुशी कभी गम’चा अपवाद सोडला तर पुढचे सारे पिक्चर्स फ्लाॅप गेले.

‘कोई मिल गया’, ‘धूम 2’ , ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ सारख्या चित्रपटांनी त्याचं करीयर तारलं. ‘लक्ष्य’वर त्याच्या फार अपेक्षा होत्या. त्याला करारबद्ध करायला येणाऱ्या निर्मात्यांना त्यांनी ‘लक्ष्य’ बघा मग चित्रपट स्विकारतो सारखी विचित्र अट घालून आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला होता. त्याची अफेअर्स, सुझेन खानसोबतचा घटस्फोट आणि चित्रपटांचीच चुकीची निवड यामुळे हृतिकसारख्या परफेक्शनिस्ट कलाकाराला उत्तम चित्रपटात बघायची संधी चाहत्यांनी गमावली म्हणणं संयुक्तिक ठरेल.

पण…हे सारं जितकं खरं तितकंच खरं त्याचं सुपरस्टार असणं ही लखलखीत सोन्यासारखं होतं. हृतिकचे जितके चित्रपट सुपरहिट झाले ते सारे चित्रपट आठवून बघा. उत्तम अभिनय, त्याचा डान्स त्याचे फाईटसिन्स,त्याचं शरीरसौष्ठव…तो पहिला असा हिरो आहे ज्यांने प्रेक्षकांना आपल्यात असणाऱ्या कोणत्या तरी कमतरतेसकट मला स्वीकारा असं छुपं आव्हान केलं नसेल. तो परफेक्ट पॅकेज बनूनच दिसला नव्हे त्याचा तोच अट्टाहास असायचा.एका मुलाखतीत जया बच्चन म्हणाली होती, त्यांने थोडंस imperfect असावं म्हणजे बरं वाटेल. तिची ती ही इच्छा त्याने पूर्ण केली ‘सुपर 30’ तला आनंदकुमारचा रोल स्वीकारून.

मेक-अप करूनही त्याचं झळाळणारं रुप, त्याचा आब, त्याचं हृतिक रोशन असणं झाकोळता आलं नाही अशा ‘सुपर 30’ मध्ये त्याने काम का करावं प्रश्न पडतो. मार्वेलच्या सुपरहिरोला शोभणारं रुपडं सुपर ३० च्या आनंदकुमारच्या कॅरेक्टरसाठी शोभणार तरी कसं? जिथे त्याच्या देखणेपणाने जगभराचं लक्ष वेधून घेतलं होतं. ‘मोस्ट हँडसम फेसेस’ या पोलमध्ये तो टॉप 5 मध्ये होता.सलग तीन वेळा ‘सेक्सिएस्ट एशियन मॅन’ आणि ‘सेक्सिएस्ट फादर’चा किताबही जिंकला तिथे सुपर 30?असो

छान करीयरची गाडी चालू असताना त्याला स्लिपडिस्कचा आजार झाला. शरीर बेढब झालं.पण हार मानेल तो हृतिक कसला.

सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर तो ‘क्रिश 3’ साठी तयार झाला. जे आपल्याला पडद्यावर दिसत असतं ते नेहमी नेत्रसुखद असतं फक्त त्यामागची मेहनत ठाऊक नसते. युट्युबवर एक व्हिडिओ आहे ज्यात हृतिकने सहा महिन्यात घेतलेली मेहनत, त्याची इच्छाशक्ती बघण्यासारखी आहे. ती बघून कुणालाही त्याला सलाम करावासा वाटेल

आजचे बरेच स्टार्स सामाजिक बांधिलकी जपत आहेत,हृतिकही ते जपतो.विविध धर्मादाय संस्थांना नियमित मदत करतो तसेच गुजारिशपासून पॅराप्लेजिक लोकांच्या आर्थिक मदतीसाठी त्याने स्वतःचे फाउंडेशनही स्थापन केले आहे. आपल्या कर्मचाऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक गरजांचीही काळजी घेतो.

भारतातील सर्वाधिक कमाई करणार्‍या या देखण्या अभिनेत्यांने सहा फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक पुरस्कार जिंकले आहेत , त्यापैकी चार सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी मिळाले.शाळेत असताना सहावं बोट आहे म्हणून ज्या मुलासोबत इतर मुलं मैत्री करत नव्हती आज तोच मुलगा न्यूनगंडावर मात करुन फक्त आयुष्यात यशस्वी झाला नाही तर त्याच्याकडे जग रोल मॉडेल म्हणून बघत आहे. त्याचं परफेक्शनिस्ट असणं वादातीत आहे आणि आजही तो स्वतःवर ज्याप्रकारे मेहनत घेत आहे ती मेहनत त्याच्या परफेक्शनला दर पिक्चरगणिक ‘रोशन’च करत आहे.