बोंबडेश्वरा बोंबाडे काढ! बोंबाडे काढ!!

>> स्वप्नील साळसकर

बोंबडेश्वरा बोंबाडे काढ, बोंबाडे काढ अशी साद घातल्यास कुंडातून आपसूकच बुडबुडे येण्यास सुरुवात होते. मालवण तालुक्यातील मठबुद्रुक गावातील हे रहस्यमयी सत्य आहे. यामागे वैज्ञानिक कारण असले तरी महादेवाचे स्थान असलेल्या मंदिर परिसरातील दोन तळ्यांमधील बारमाही मुबलक पाणी ग्रामस्थांचा मोठा आधार बनले. सिंधुदुर्ग जिह्यात प्रसिद्ध असलेल्या या देवस्थान क्षेत्री धार्मिक पर्यटनासाठी येणाऱया पर्यटकांची संख्या मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.

मालवण तालुक्यातील मठबुद्रुक गावात असणाऱया बोंबडेश्वर मंदिर परिसरात असणाऱया कुंडामधून निसर्गाचा अद्भुत चमत्कार पाहायला मिळतो. या मंदिराची स्थापना केव्हा झाली याची निश्चित माहिती नाही. यात छोटासा गाभारा असून शिवलिंग आहे. बांधकाम करताना येथील शिळेतून रक्त निघाल्यामुळे येथील जोडकाम थांबवण्यात आले. मठबुद्रुक गावाची रचना करणारे गोसावी, गावातील प्रत्येक ठिकाणाचे महापुरुष यांचे स्थान मंदिरात आहे. गावातील रस्त्यावर हे देवस्थान असल्यामुळे कुणकेश्वर भेटीसाठी जाणाऱया देवस्वाऱया, वाटसरू या पाण्याच्या ठिकाणी विश्राम करून पुढे निघतात. या दृष्टिकोनातून धर्मशाळा बांधण्यात आली. जैन भैरी देवी मंदिराच्या खालून पाण्याचा उगम होत असून दोन तळ्यांमध्ये हे पाणी समपातळीत साचून राहते. मुख्य वैशिष्टय़ म्हणजे चैत्र महिन्यात येथील पाण्याच्या पातळी वाढ होते. कुंडांमध्येही पिंडी असून या पाण्यात सलग पाच दिवस स्नान केल्यावर त्वचारोग नष्ट होत असल्याची भाविकांची धारणा आहे.

माशांचा डावा डोळा बाद

पावसाळ्यात चढणीचे मासे या कुंडांमध्ये येण्याचा प्रयत्न करतात. मात्र वर्षानुवर्षे आपली जागा धरून असलेले चांदके, बँल मासे त्यांना आपल्यात घेत नाहीत. दुसरे वैशिष्टय़ म्हणजे खालून मासा वरील तळ्यात आला तर त्याचा डावा डोळा बाद होतो हे तिथे आजही पाहायला मिळते. या माशांची वाढ होत नसून आकाराने ते लहानच राहतात.