फडणीस बंधूंचा उद्योग जगतात ठसा; जिद्दीने उभारला डेअरी व्यवसाय

>> अश्विन बापट

तीन भाऊ बेळगावहून येतात. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द मनी बाळगून, तरीही दर्जाशी तडजोड करण्याचा संकल्प करतात. मुंबईत डेअरी उत्पादनात जम बसवतात. आज दक्षिण मुंबईत सहा ठिकाणी त्यांची विक्री केंद्रे सुरू झालीत. सुधीर डेअरी हे दक्षिण मुंबईतील खाद्यप्रेमींच्या मनावर ठसलेले नाव आहे. ही कहाणी आहे सुधीर, सुरेश आणि महेश या फडणीस बंधूंची.

 नव्या पिढीकडे व्यवसायाची जबाबदारी

फडणीसांची पुढची पिढी म्हणजे सुरेश फडणीस यांची दोन्ही मुले चार्टर्ड अकाऊंटंट तसेच डेअरी सायन्समध्ये उच्च शिक्षण घेऊन या व्यवसायात जबाबदारी पेलतायत. तसेच महेश यांचा मुलगाही डेन्मार्कला शिकून येऊन याच व्यवसायात प्रगत शिक्षणासह कार्यरत आहे. सुधीर यांची कन्याही चार्टर्ड सेक्रेटरी होऊन तिच्या व्यवसायात उत्तम काम करतेय. गरज लागेल तेव्हा आम्हाला मदतही करते. आता डेअरी उत्पादनांशिवाय मिठाईमध्ये बर्फी प्रकार, रसगुल्ला, रसमलाई, गुलाबजाम असेही गोड पदार्थ विक्रीला आहेत. तसेच आम्ही आता फरसाण, शेवसारखी उत्पादनेही सुरू केलीत. भविष्यात कुल्फीसारख्या उत्पादनातून आणखी विस्तार करण्याचा आमचा मानस आहे, असेही सुरेश फडणीस यांनी  सांगितले.

या प्रवासाबद्दल विचारले असता सुरेश फडणीस म्हणाले, आम्ही तिघेही पोटापाण्यासाठी 80-90 च्या दशकात मुंबईत आलो. काहीतरी करून दाखवण्याची जिद्द आमच्या तिघांमध्ये ठासून भरलेली होती.  आम्ही 1994 मध्ये गोकुळ, मयूर ब्रँडचे दूध विकत घ्यायचो. दोन वर्षे हा व्यवसाय केला. मग 1996 पासून आम्ही थेट मयूर डेअरीचे दूध विक्री करत असू. हे 2002 पर्यंत सुरू राहिले. हुतात्मा डेअरी, शाहू दूध संघ, यशवंत दूध या संघांसाठीही आम्ही मुंबईत दूध विक्री केली.

या काळात काम करताना नुसती विक्री करत राहण्यापेक्षा आमची स्वनिर्मिती काहीतरी असावी, आपलाही या व्यवसायावर ठसा असावा, अशी आमची मनोमन इच्छा होती. तिथूनच जन्म झाला सुधीर डेअरी ऍण्ड स्वीट्स प्रा. लि. चा. मुंबईच्या डोंगरी भागात 2002 मध्ये पहिले विक्री केंद्र सुरू झाले तेव्हा दूध, दही, ताक, लस्सी, पनीर, बासुंदी आणि श्रीखंड ही आमची उत्पादने होती. आता 2024 मध्ये डोंगरीसह माझगाव, ताडदेव, लोअर परळ, शिवडी आणि गिरगाव अशी एकूण सहा विक्री केंद्रे झालीत. मधल्या काळात 2010 मध्ये आमचा ज्योतार्ंलग मिल्क फूड हा दुधाचा प्लांट आम्ही कोल्हापूरला सुरू केला.

या प्रवासात 2018 मध्ये आम्ही उत्पादने वाढवली. आजच्या घडीला आमच्याकडे 35 ते 40 उत्पादने आहेत. सात ते आठ कर्मचाऱयांनी सुरू झालेल्या आमच्या व्यवसायात आज आमच्याकडे कोल्हापूर आणि मुंबई मिळून सुमारे 75 कर्मचारी आहेत. आज महापेमध्ये आमची फॅक्टरी आहे, जिथे सगळी उत्पादने तयार होतात. आमच्याकडे श्रीखंडामध्ये ड्रायफुट, केशर, मँगो, स्ट्रॉबेरीसारखी विविध फ्लेव्हर्स आहेत. दिवसाला 35 हजार लिटर दूध, तर महिन्याला एक हजार किलो श्रीखंड आणि 30 हजार लिटर ताक इतका छान प्रतिसाद आम्हाला आहे. आम्ही कुणालाही फ्रँचायझी देऊन आमच्या उत्पादनांची विक्री सुरू केलेली नाही. याचे मुख्य कारण खाद्यपदार्थ व्यवसायात असल्याने आमच्या उत्पादनांना एक्सपायरी डेट असते. ती आम्ही कसोशीने पाळतो. म्हणजे तारखेची मुदत संपलेली उत्पादने आम्ही तत्काळ नष्ट करतो. लोकांचे आरोग्य आणि दर्जा याच्याशी कोणतीही तडजोड आम्ही करत नाही. तसेच रोज सकाळी आमच्या फॅक्टरीतील ऑफिसमध्ये 9.30 वाजता आमच्या उत्पादनांचे ताट भरून येते. त्याची गुणवत्ता फार काटोकोरपणे तपासली जाते.  नफ्याच्या मार्जिनपेक्षा आम्हाला ग्राहकांचे हित जपणे जास्त महत्त्वाचे वाटते.

 (लेखक एबीपी माझाचे सीनिअर प्रोडय़ूसरसीनिअर न्यूज अँकर आहेत.)