प्रॉमिसिंग – स्वप्नपूर्तीच्या दिशेने…

>> गणेश आचवल

झी मराठीवरील ‘सारं काही तिच्यासाठी’ या मालिकेत निशिगंधा अर्थात ‘निशी’ ही भूमिका करणारी अभिनेत्री म्हणजे दक्षता जोईल… एक प्रॉमिसिंग चेहरा.

दक्षताचे शालेय शिक्षण खार येथील अनुयोग विद्यालयात झाले. वक्तृत्व स्पर्धा, शाळेतील स्नेहसंमेलन अशा विविध कार्यक्रमांत भाग घेण्यासाठी तिला तिच्या आई-बाबांकडून कायम प्रोत्साहन मिळाले. साठये कॉलेजमधून मास मीडियामध्येच तिने ग्रॅज्युएशन केले. दक्षता म्हणते, ‘‘साठये कॉलेजला असताना आयएनटी एकांकिका, मुंबई विद्यापीठ युवा महोत्सवातून माझ्या अभिनय कलेला उत्तम व्यासपीठ मिळाले. युथ फेस्टिव्हलमध्ये मला एकपात्री अभिनयात सुवर्णपदक मिळाले, तर आमच्या स्किटसाठी आम्हाला सिल्व्हर मेडल मिळाले. मी एकांकिकेत काम करण्याबरोबर नाटकांचे नेपथ्य, वेशभूषा अशा बाकी गोष्टीतदेखील मदत करत होते. त्यातून खूप शिकता आले, पण खऱया अर्थाने ‘भूमी’ या आमच्या एकांकिकेने माझ्या आयुष्यात वेगळे वळण आणले. मला आयएनटीमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.’’

दक्षताने ‘महाराष्ट्राचा सुपरस्टार’मध्ये अंतिम दहा स्पर्धकांमध्ये स्थान मिळवले आणि ‘या सीझनमधील सर्वोत्कृष्ट अष्टपैलू अभिनेत्री’ हा पुरस्कारदेखील मिळवला. लॉकडाऊननंतर ‘सन मराठी’वरील ‘आभाळाची माया’ मालिकेत तिला प्रमुख भूमिका मिळाली. मग तिने ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतदेखील भूमिका केली.

‘सारं काही तिच्यासाठी’मध्ये ‘निशी’ या भूमिकेबद्दल ती म्हणते, ‘‘निशी ही खूप हळवी आणि संवेदनशील आहे. सर्वांचा विचार करणारी आहे, नाती जपणारी आहे. तिला बॅडमिंटनची आवड आहे. असे विविध पंगोरे या व्यक्तिरेखेला आहेत.’’ नुकत्याच झालेल्या ‘उत्सव नात्यांचा’ सोहळय़ात दक्षताने सर्वोत्कृष्ट भावंडे हा पुरस्कार ओवीची भूमिका करणाऱया अभिनेत्रीसोबत मिळाला. सातत्याने मेहनत केल्याने स्वप्न सत्यात येऊ शकते, हे दक्षता दाखवून देतेय.