खाऊगल्ली- मध्यरात्रीची चटकदार सैर

>> संजीव साबडे

मध्यरात्रीची खादाडी ही काही मुंबईची मक्तेदारी नाही. मध्य मुंबईतल्या माटुंगा, माहीमपासून गोरेगाव, बोरिवली ते ठाणे, घोडबंदरपर्यंत रात्रीच्या उदरभरणासाठी चांगले पर्याय दिसून येतात. एकदा अन्न पूर्णब्रम्ह मानलं की काळवेळ पाळण्याची खरोखरच काही गरज नसते. हो की नाही!

मध्यरात्रीच्या खाद्यपदार्थांची मध्यंतरी सैर केल्यानंतर लक्षात आलं की, अद्याप असंख्य ठिकाणं राहूनच गेली आहेत. सर्व ठिकाणांचा उल्लेख करणं शक्यच नव्हतं. पण काही महत्त्वाची ठिकाणं राहूनच गेली. उदाहरणच द्यायचं झालं तर, माटुंगा पूर्व येथे गुजरात क्लबजवळील ‘चटई पावभाजी.’ तिथे चटईवर बसूनच पावभाजी खावी लागते. घरी खाली बसून जेवतात तसंच. किंग्ज सर्कल, सायन, माटुंगा पश्चिम, दादर येथील लोकांना हे ठिकाण माहितीचं आहेच. पावभाजीबरोबर मसाला पाव, लसूण पाव, तवा पुलाव मिळणारं हे ठिकाण मध्यरात्रीपर्यंत खुलं असतं. बोरिवलीच्या शिंपोली भागात ‘एग स्टेशन’ आहे. मध्यरात्रीपर्यंत सुरू असणाऱया या छोट्याशा रेस्टॉरंटमध्ये एग लपेटा, एग शोले, एग आम्लेट अँड सुरती घोटाळा, मेक्सिकन एग रोल, इराणी भुर्जी, बॉइल्ड एग मसाला, ग्रीन चीज आम्लेट, एग मुघलाई असे सब कुछ अंडी पदार्थ मिळतात. हे ठिकाण फारच पॉप्युलर आहे. कांदिवली पश्चिमेच्या इराणी वाडीत भगवती पावभाजीकडेही रात्री दीड वाजेपर्यंत तुम्हाला उदरभरण करता येईल.

मांसाहारी मंडळी रात्री चमचमीत पदार्थांच्या शोधात असतात. गोरेगाव पूर्वेला आरे रोडवर श्रेयसनगर भागात कबाब जंक्शन अँड तंदुरी फिश आहे. चिकन कबाब व विविध प्रकारचे टिक्का, चिकन पोट्टा, तंदुरी चिकन, कोळंबी फ्राय, कलेजी फ्राय असे असंख्य प्रकार मिळणारं ठिकाण रात्री दीड वाजेपर्यंत सुरू असतं. इथे रात्री खूप गर्दी असते. अंधेरीच्या पश्चिमेकडील भवन्स कॉलेज परिसरातील फॅटबॉय किचनमध्येही रात्री उशिरापर्यंत व्हेज, नॉनव्हेज बर्गर, सँडविचेस मिळतील. अंधेरी पूर्वेला मरोळ पाइपलाइन रोडवर असलेला अपना धाबाही तुम्ही पहाटे सहा वाजेपर्यंत ट्राय करू शकता. तो प्रसिद्ध आहे मांसाहारी पदार्थांसाठी. ग्रॅण्ट रोडच्या दिल्ली दरबारमधील बिर्याणीचं कौतुक ऐकलेलं असतं. काही जणांनी तिथे बिर्याणी व इतर पदार्थ दिवसा खाल्लेलेही असतात. पण हे ठिकाण मध्यरात्रीनंतर अडीच वाजेपर्यंत येणाऱया लोकांना उत्साहाने  खाऊ घालतं. मरिन लाइन्स, काळबादेवी भागात आदर्श अन्नपूर्णा नावाचं ठिकाण आहे. हे राजस्थानी व पंजाबी, उत्तर भारतीय खाद्यपदार्थ व जेवण देणारं ठिकाण, अलीकडे लोकांच्या आवडीनिवडी पाहून चायनीज पदार्थही खाऊ घालत आहे. पण छोले भटुरे, नान, कुलचे, विविध रोटी, पराठे आणि अगणित भाज्या हे या रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य आहे. मालाड पश्चिमेला ऑर्लेम चर्चच्या जवळ सॉसेज पावचा स्टॉल खूप पॉप्युलर आहे. तिथे सॉसेज पाव तर मिळतोच, पण बीफ चिली, स्टीक सँडविच, गोवन पद्धतीचं कॅफ्रियल चिकन व पाव आणि असंख्य गोवन प्रकार तिथे मिळतात. दीड वाजेपर्यंत किंवा स्टॉलवरील पदार्थ संपेपर्यंत तो सुरू असतो.

तुम्ही घरी पहाटे चार वाजताच जागे झालात आणि मिसळ-पाव खाण्याची हुक्की आााr तर मुलुंड पश्चिमेच्या सर्वोदय नगरमध्ये पहाटे चार ते सकाळी सात वाजेपर्यंत मिसळ-पाव खायला मिळू शकतो. टॅक्सी व रिक्षावाले आणि पहाटे वॉक करून येणारे काही जण तिथेच आपला नाश्ता अवघ्या 40-50 रुपयांत आटोपतात. चुकून माकून अडनिड्या वेळेला त्या भागात असाल तर टेलीस कुटुंबीय चालवत असलेल्या मिशेल मिसळ-पावला भेट द्यायला हरकत नाही. भांडुप पश्चिमेला भाटिया हॉस्पिटलपाशी असलेल्या ड्रगन फ़ूड कोर्टमध्ये रात्री बारा-साडेबारापर्यंत विविध व उत्तम चायनीज पदार्थ खायला मिळू शकतात. येथील दर वाजवी आहेत. प्रामुख्याने चायनीज आणि एखाद दुसरा थाई पदार्थ इथे मिळू शकतो. जोगेश्वरी पश्चिमेला स्वामी विवेकानंद मार्गावरील मुन्ना फास्ट फूड रात्री एक वाजेपर्यंत सुरू असतं. नावात फास्ट फूड असलं तरी तिथे सँडविच व अन्य फास्ट प्रकारांबरोबर मुघलाई, चायनीज खाद्यपदार्थ व रोटीचे विविध प्रकार, भाज्या, तंदूर पदार्थ आणि चहा व लस्सी हेही मिळतं. अर्थात तेथील तंदुरी व मुघलाई पदार्थ अधिक चांगले असतात. रात्री जुहूला अमिताभ बच्चनच्या ‘प्रतीक्षा’ बंगल्यापाशी असाल तर तिथेच सागर चायनीज हे ठिकाण आहे. ते चक्क पहाटे चार वाजेपर्यंत खुलं असतं. खरं तर तो मोठा स्टॉलच आहे. लोकांना बसण्यासाठी समोर टेबल व खुर्च्या टाकलेल्या असतात आणि रात्रभर कुटुंबीयांसह लोक तिथे खाताना दिसतात. अभिनेता कार्तिक आर्यन मित्रांसह तिथे अनेकदा खायला येतो. त्याच्या नावाची एक स्पेशल डिशही आहे. रात्री उशिरापर्यंत जुहूमध्ये फिरून झालं की तिथे बरेचजण जाऊन खातात.

ठाणे हे खऱया अर्थाने तब्येतीत खाणाऱयांचं ठिकाण म्हणता येईल. ठाणे व पुणे यांच्यात जणू स्पर्धाच असावी. ठाण्यातील अनेक रेस्टॉरंट जेवणासाठी प्रसिद्ध आहेत. पण स्नॅक्स देणारी काही रात्री उशिरापर्यंत सुरू असतात. मल्हार सिनेमासमोर ‘द शेल्टर’ नावाचं मस्त रेस्टॉरंट आहे. तीन मजले आहेत त्याचे आणि रात्री उशिरापर्यंत तिथे खूप लोक गप्पा मारत खात असतात. पंजाबी व मुघलाई खाद्यपदार्थ हे तेथील वैशिष्ट्य. रात्री एक वाजेपर्यंत इथे तुम्हाला खायला मिळू शकतं. घोडबंदर रोडवर तुम्ही असाल तर यांचंच शेल्टर फार्म हे गार्डन रेस्टॉरंट आहे. ते एकदम शांत ठिकाण आहे. ठाणे रेल्वे स्टेशनच्या पश्चिमेला कॅनॉन पावभाजी आणि स्नॅक्स कॉर्नर आहे. स्टेशन परिसरातलं हे ठिकाण 24 तास खुलं असतं. पाव भाजी, मिसळ, पिझ्झा, सँडविच, चायनीज पदार्थ, रोटी व भाज्या, ज्यूस, लस्सी असं सारं काही इथे मिळतं. ‘ठाणे तिथे काय उणे’ असंच म्हणता येईल.

ठाण्यातल्या विवियाना मॉलमधील हिचकी रेस्टॉरंट रात्री दीड वाजेपर्यंत सुरू असतं, तर गोकुळनगर भागातील ‘टुक टुक पावभाजी’चा ट्रक तर पहाटे चार वाजेपर्यंत खुला असतो. त्यामुळे मुंबईप्रमाणे ठाण्यात रात्री-अपरात्री गेलात वा असलात तरी उपाशी राहण्याची पाळी येणार नाही. रात्री 12 वाजता बंद असं सांगितलं तरी काही ठिकाणी अनेकदा शेवटची ऑर्डर 12 वाजता घेतली जाते. पदार्थ टेबलावर यायला 20/25 मिनिटांचा वेळ जातो. बाहेर पडायला तर एक वाजतो. शटर बंद करून आत किचन सुरू ठेवणाऱया ठिकाणी अनेकदा खाल्लं आहे. मुख्य म्हणजे चला, काही तरी करून खायला घालू, असा किचनचा मूड नसतो. ठाण्यात कोकणी, मालवणी, वैदर्भीय, कोल्हापुरी पध्दतीची आणि शेतकरी नावाचं एक रेस्टॉरंट आहे. महाराष्ट्र लंच होम खूपच प्रसिद्ध. ती सारी रात्री 11.30 वाजता बंद होणारी आहेत. स्वतची खासियत जपणारी. त्यांच्याविषयी स्वतंत्रच लिहावं लागेल.

[email protected]