वेबसीरिज – निखळ मनोरंजन देणारी मालिका

>> तरंग वैद्य

दूरदर्शनच्या काळातीलहम लोग, ‘देख भाई देख या आठवणीतल्या मालिका आणि सध्या गाजत असलेलीगुल्लक मालिकेशी साधर्म्य असलेली ही वेबसीरिज वेगळेपण सिद्ध करणारी आहे. हास्यविनोद, प्रेम, ममत्व, करुणा या भावनांनी सजलेली, खुमासदार संवादांनी नटलेली ही मालिका निखळ मनोरंजन देणारी आहे.

‘आम आदमी फॅमिली’ नावावरूनच लक्षात येते की, ही वेब सीरिज एक साधी, सोपी सामान्य माणसाच्या (आम आदमी) आयुष्यात घडणाऱ्या घटनांवर आधारित असणार आहे. एका महानगरातील फ्लॅट संस्कृतीत राहणाऱ्या एका मध्यमवर्गीय कुटुंबाची ही कथा आहे. नवरा-बायको 45-50 वयोगटातले, तर मुलगा-मुलगी 20-22, सोबत आजी.

‘टाईम लाईनर’ नावाने यूटय़ूबवर 2016 साली या वेब सीरिजचे काही भाग प्रदर्शित झाले आणि गाजलेही. पुढे नोव्हेंबर 2023 मध्ये झी 5 या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सर्व जुने आणि काही नवीन असे एकूण 20 भाग आले व तितकेच गाजलेही. सुरुवातीचे काही भाग 20 मिनिटांचे आणि नंतरचे 30-32 मिनिटांचे. सर्वच भागांतील विषय असे आहेत जे आपल्या किंवा आपल्या शेजारी-पाजारी घडलेले आहेत. त्यामुळे आपण बघण्यात गुंतून जातो आणि एपिसोड कधी संपला हे कळतच नाही.

वडील आणि वयात आलेल्या व स्वतला जबाबदार समजणाऱ्या मुलामधील खटके, सासू-सुनेचे भावनिक संबंध, भावा-बहिणीतील भांडण आणि प्रेम, शेजाऱ्यांनी केलेली लुडबुड, बायको आणि आईची दुहेरी भूमिकेतील तोल सांभाळणारी स्त्री. हे सर्व विषय अतिशय साधेपणाने चित्रित केले आहेत, पण बघताना खूपच प्रभावी आहेत. यात मनोरंजन आहे. कधी आपण खळखळून हसतो, तर कधी स्मित हास्य करतो. कधी डोळय़ांच्या कडा ओलावतात, तर कधी एखादा अश्रू खाली पडतो.

भावाभावात आलेले वैमनस्य कसे दूर होईल याचा आजीचा प्रयत्न आणि त्याला सुनेची साथ, शर्माजींची दुसऱ्या गावी बदली झाली हे कळल्यावर चिंतेत असलेला परिवार, मुलाचे मी आता जबाबदार आहे हे सांगणे, न सांगता अचानक घरी येऊन परिवाराला ‘सरप्राईझ’ देण्यासाठी आलेले शर्माजी, वडिलांच्या नकळत आईला स्कूटर शिकवायचा प्रयत्न, मुलगी बघायचा कार्यक्रम … हे सगळे मस्त रंगले आहेत. मुलीच्या लग्नाची तयारी व लग्न बारकाव्यांसकट चित्रित केले आहे.

बिजेंद्र काला सिनेसृष्टीतील नावाजलेला चरित्र अभिनेता. अभिनयाच्या जोरावर त्याच्या लहान भूमिका पण आपल्या लक्षात राहतात. या वेब सीरिजमध्ये तो कुटुंबप्रमुखाच्या मुख्य भूमिकेत असून त्याने मिळालेल्या संधीचे सोने केले आहे. बँकेत प्रामाणिकपणे नोकरी करणारा, आपल्याशिवाय घरातील पान हलणार नाही असा समज आणि सतत जबाबदारीचे ओझे घेऊन जगणारा माणूस त्याने जिवंत केला आहे. तो आपल्याला खूप जवळचा वाटतो. कारण या वयातील बहुसंख्य हाच समज घेऊन जगत असतात. अर्थात त्यात काहीही चुकीचे नाही.

अभिनेत्री लुबना सलीम ‘ओ माय गॉड’मुळे आपल्या लक्षात आहे. पत्नी, आई आणि सून या तिहेरी भूमिकेला तिने न्याय दिला आहे. आपल्या देशात प्रत्येक स्त्री या तीनही भूमिका पार पाडत असते. त्यामुळे स्त्रिया तिच्यात आपल्याला बघतात. नवऱ्याला समजून घ्यायचे तर मुलांना समजावून सांगायचे आणि घरात कोणीही दुखावणार नाही ही काळजी घ्यायची.  लुबनाने प्रशंसनीय काम केले आहे. मुला-मुलीने आपली कामे छान केली आहेत. कमलेश गिल आजीच्या भूमिकेत धमाल करून जातात. त्यांचा खटय़ाळपणा चेहऱ्यावर हसू आणतो, तर त्यांचा प्रेमळ स्वभाव मनात घर करून जातो. त्यामुळेच त्यांच्या मृत्यूचा प्रसंग बघताना शर्मा परिवाराच्या दुःखात आपण पण सहभागी होऊन जातो.

कलाकारांबरोबर या मालिकेच्या यशामागे लेखक आणि दिग्दर्शकाचा पण मोठा हात आहे. आपण आपापसात बोलतो तेच संवाद आहेत. त्यामुळे आपणच बोलतोय असे वाटते. दिग्दर्शकानेही साधेपण जपताना प्रभाव कमी होऊ दिला नाहीये. त्यामुळेच मालिका प्रेक्षकांच्या पसंतीत पुरेपूर उतरली आहे.

[email protected]

(लेखक सिनेदिग्दर्शक पटकथाकार आहेत)