IND vs PAK – विराट कोहली आणि के एल राहुलची दमदार शतकी खेळी, 357 धावांचं आव्हान दिलं

हिंदुस्थान-पाकिस्तान यांच्यातला आशिया चषक 2023 स्पर्धेतील राखीव दिवसाचा खेळ पावसाच्या सावटाखाली सुरू झाला असला तरी या खेळात हिंदुस्थानच्या दोन खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या शतकी खेळींच्या जोरावर हिंदुस्थानने 357 धावांचं आव्हान पाकिस्तानसमोर ठेवलं आहे.

हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सुपर फोर सामन्यात पावसाने व्यत्यय आणला होता. रविवारी खेळ पूर्ण होऊ शकला नाही. 24.1 षटकांनंतर पावसामुळे हिंदुस्थानच्या डावात व्यत्यय आला. यानंतर एकही चेंडू टाकता आला नाही. या सामन्यासाठी एसीसीने आधीच राखीव दिवस निश्चित केला होता. सोमवारी हा सामना सुरू झाला. या सामन्यात विराट कोहलीने इतिहास रचला आहे. विराट कोहलीने वनडे क्रिकेटमधील 47 वे शतक झळकावले. यासह विराट कोहलीने 13000 धावाही पूर्ण केल्या आहेत. विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 13000 धावा पूर्ण केल्या आहेत. त्याने या सामन्यात 122 धावा केल्या. केएल राहुलनेही शानदार कमबॅक करत 100 चेंडुंत आपलं शतक पूर्ण करत 111 धावा केल्या आहेत. त्यात 10 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश आहे. हे त्याचे एकदिवसीय क्रिकेटमधील सहावे शतक आहे.

रविवारी दोन्ही संघातील सामना सुरू झाला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. हिंदुस्थानला या निर्णयाचा फायदा झाला. रोहित आणि शुबमन यांनी 121 धावांची विक्रमी भागीदारी केली. रोहित 56 तर शुबमनही 58 धावांवर बाद झाला. 24.1 षटकानंतर हिंदुस्थानच्या 2 बाद 142 धावा झाल्या असताना पावसामुळे खेळ थांबवावा लागला. मात्र, पाऊस सतत पडत असल्याने आणि मैदान ओले असल्याने हा सामना राखीव दिवशी आहे त्या धावसंख्येहून पुढे घेण्याचा निर्णय घेण्यात आला.