अंजूमुळे नसरुल्ला आणि मोहल्ला सगळेच परेशान

हिंदुस्थानातून पळालेली अंजू पाकिस्तानात गेल्यापासून दोन्ही देशातील तिच्याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. पाकिस्तानात जाऊन नसरुल्लाहशी लग्न केल्यानंतर अंजूने फातिमा नाव धारण केलंय. लग्नानंतर पाकिस्तान सरकार अंजूवर भलतेच मेहरबान झाले आहे. शाहबाज सरकारच्या सूचनेवरून एका कंपनीने अंजूला वर्क फ्रॉम होमची सुविधा असलेली नोकरी दिली आहे, तर एका पाकिस्तानी व्यावसायिकाने अंजूला 40 लाखांचे घर भेट म्हणून दिले आहे. असा सगळ्या सोयीसुविधा मिळाल्यानंतरही अंजूशी निकाह करणारा नसरुल्ला चिंतेत आहे. अंजूसोबत लग्न केल्यानंतर नसरुल्लाला त्रास सहन करावा लागतोय. त्याच्यासोबत त्याच्या घरचे आणि आजूबाजूच्या लोकांनाही त्रास सहन करावा लागतोय असा दावा केला जात आहे.

आपली दोन मुले आणि पती यांना मागे सोडून अंजू पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा भागातल्या नसरुल्लाला जाऊन भेटली. या दोघांनी तिथे लग्न केलं ज्यामुळे हिंदुस्थानात तिच्या घरचेच नाही तर देशातील बहुसंख्य लोकं आश्चर्यचकीत झाली. या दोघांचे फोटो, व्हिडीओ पाकिस्तानी माध्यमात गाजत असून ते सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. घरातून काहीही न सांगता बाहेर पडलेल्या अंजूने घरच्यांनी फोन केला असता आपण एका पाकिस्तानी मित्राच्या घरी लग्नात सहभागी होण्यासाठी आलो आहोत असं खोटं सांगितलं होतं. अंजूने लग्नासाठी आलो आहो हे सांगितलं होतं, मात्र लन्ग हे तिचंच आहे हे सांगितलं नव्हतं. जेव्हा नसरुल्लाशी तिने निकाह केल्याचं वृत्त पसरलं तेव्हा तिच्या घरच्यांना जबर धक्का बसला होता.

नसरुल्ला वैतागला

अंजूशी लग्न केल्यानंतर नसरुल्ला खूप नाराज असल्याचं सांगितलं जात आहे. बीबीसीने दिलेल्या बातमीनुसार नसरुल्ला हा खैबर पख्तूनख्वाच्या अप्पर दीरचा रहिवासी आहे. इथल्या महिलांना जास्त बोलण्याची आणि घराबाहेर पडण्याची परवानगी नाही. मात्र अंजू आणि नसरुल्लाच्या लग्नानंतर, पाकिस्तानातील मीडिया त्यांच्या घराबाहेर गराडा घालून बसले असून त्यांना या दोघांना भेटायचे असते. यामुळे नसरुल्ला नाराज आहे. त्याच्या परिसरातील नागरिक व कुटुंबीयांचे जीवनही या गर्दी, गोंगाटाला वैतागले आहेत. हा परिसर अतिशय शांत आहे आणि येथील लोकांना बाहेरील लोकांपासून दूर राहणे आवडते. पण, अंजू इथं आल्यापासून जी गर्दी व्हायला लागली आहे ती पाहून इथले सगळेच चिंतेत आहेत. अंजू इथली पाहुणी आहे असं या लोकांचं म्हणणं असून त्यांच्या बोलण्यावरून ते अंजूला स्वीकारायला तयार नसून ती फार काळ इथे राहणार नाही असे वाटायला लागले आहे.

नसरुल्लाच्या कुटुंबाला इशारा

अंजू आणि नसरुल्लाबाबत आपण लवकरच निर्णय घेणार असल्याचे नसरुल्लाह यांच्या कुटुंबीयांनी सांगितले आहे. गावातील काही लोकांनी लवकरात लवकर हे प्रकरण मिटवून गावात शांतता प्रस्थापित करा असा इशाराच दिला आहे. असं न झाल्यास नसरुल्लाच्या कुटुंबाने राहण्यासाठी वेगळी जागा शोधावी अशं ग्रामस्थांनी म्हटलं आहे. दुसरीकडे, अंजू ही हिंदुस्थानातून आल्याने पाकिस्तानातील तपास यंत्रणाही तिच्यावर आणि नसरुल्लाच्या कुटुंबावर बारीक लक्ष ठेवून आहे. अंजू आणि नसरुल्ला यांच्या कुटुंबासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पाकिस्तानी पोलीस अधिकाऱ्यांनी याबाबत बोलताना म्हटले की अंजूला 21 ऑगस्टपर्यंत हिंदुस्थानात पाठवण्याचे आदेश त्यांनी नसरुल्ला याला दिले आहेत. अंजूच्या व्हिसाची मुदत संपत असल्याने तिला मुदतीनंतर पाकिस्तानात ठेवू नये असे पाकिस्तानी पोलिसांनी बजावले आहे.अंजू आणि नसरुल्ला फेसबुकवर एकमेकांना भेटले होते आणि त्यानंतर त्या दोघांमधील जवळीक वाढत गेली आणि ते एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघांनी प्रत्यक्ष भेटण्याचा निर्णय घेतला आणि अंजूने धाडस करत थेट पाकिस्तान गाठले.