बीड, माजलगाव घटनेतील आरोपींची नावे घोषित करण्याची मराठी क्रांती मोर्चाची पोलीस महानिरीक्षकांकडे मागणी

मराठा आरक्षणाच्या आंदोलनासाठी बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी उपोषण, आंदोलन करण्यात आले होते. बीड, माजलगाव या ठिकाणी लोकप्रतिनिधींच्या घरावर तसेच कार्यालयावर अज्ञातांकडून जाळपोळ, दडफेक करण्यात आली होती. यामध्ये लोकप्रतिनिधींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सदरील घटनांच मराठा क्रांती मोर्चाकडून पत्रक काढून निषेध करण्यात आला होता.

हिंसक घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने 119 संशयित आरोपींना ताब्यात घेतलेले असून आणखी 150 जणांची ओळख पटवली आहे. गुरुवारी छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांनी बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई परळी येथे मराठा समाजाच्या आंदोलकांची भेट घेतली होती. दरम्यान परळीत आल्यावर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने पोलीस महानिरीक्षकांना बीड, माजलगाव घटनेच्या गुन्ह्यातील आरोपींचे नावे जाहीर करण्याची मागणी केली गेली.

पोलीस महानिरीक्षकांना दिलेल्या पत्रात मराठा आरक्षण अंदोलनादरम्यान माजलगाव,बीड येथील झालेली जाळपोळ घटनेतील आरोपी हे आमच्या विचाराचे मराठा समाजाचे नसुन त्यांनी व्यक्तीगत उद्देशाने किंवा मराठा आंदोलन बदनाम करण्याच्या हेतूने हे कृत्य केलेले असावे. या प्रकरणाची व्यक्ती निहाय चौकशी करून आरोपीचे नाव प्रसार माध्यमात प्रसिद्ध करण्यात यावे. मराठा अंदोलक आजतागायत लोकशाही मार्गाने भूमिका घेत आलेले आहेत असे कृत्य मराठा आंदोलक करणार नाहीत असे म्हटले आहे.