भाऊबीज का साजरी करतात…जाणून घ्या पौराणिक महत्त्व…

कार्तिक महिन्यात शुक्ल पक्षात द्वितीयेला भाऊबीज साजरी करण्यात येते.  पंचागानुसार बुधवारी भाऊबीज साजरी करण्यात येत आहे. या सणामागे यमाशी संबंधित आख्यायिका आहे. त्या दिवसाची आठवण म्हणून हा सण साजरा करण्यात येतो.

भावाला दिर्घायुष्य लाभावे, त्याचा भाग्योदय व्हावा आणि सर्व संकटापासून त्याचे रक्षण व्हावे, यासाठी बहिण भावाला ओवाळते. या दिवशी यमुनाने आपला भाऊ यमराज याला ओवाळले होते आणि त्याच्याकडून वरदान मागितले होते. या दिवशी जे आपल्या बहिणीच्या घरी जाऊन तिला भेटवस्तू देतील आणि ओवाळून घेतील, त्यांना दिर्घायुष्य़ लाभेल आणि त्यांची सर्व संकटातून मुक्तता होईल. त्यांना अकाल मृत्यू येणार नाही, असे वरदान यमुनाने यमाकडे मागितले होते. तेव्हापासून या पंरपरेचे पालन करत भाऊबीज साजरी करण्यात येते.

या दिवशी भावाने बहिणीकडे जायचे असते. तसेच तिला ओवाळणी देत तिच्याघरीच जेवायचे असते, अशी मान्यता आहे. बहिणीने भावाला ओवाळताना त्याचा चेहरा पूर्व किंवा उत्तर दिशेला असावा. दक्षिण ही यमाची दिशा मानण्यात येत असल्याने दक्षिणेकडे चेहरा करून ओवाळणी करू नये, असाही समज आहे.

भावाने बहिणीश खोटे बोलू नये, असे केल्यास यमराज नाराज होतात, असा समज आहे. त्यामुळे या दिवशी बहिणीसाठी भाऊ भेटवस्तू घेऊन जातात. तसेच हा सणाचा दिवस असल्याने या दिवशी मांसाहार टाळण्याचा सल्ला दिला जातो. तसेच मद्यपान आणि इतर व्यसने टाळण्यासही सांगितले जाते. असे केल्यास दिर्घायुष्य लाभते आणि भाग्योदय होतो, अशी मान्यता आहे. तसेच बहिणीने ओवाळण्यापूर्वी भावाने काहीही खाऊ नये, असेही सांगण्यात येते. या सणाचा संबंध यम आणि यमुना या भाऊ- बहिणीशी असल्याने दिर्घायुष्यासाठी या सणाला विशेष महत्त्व आहे.