कोणत्याही महिलेला कुटुंबाच्या उपचारांसाठी मंगळसूत्र गहाण ठेवावे लागणार नाही; राहुल गांधी यांचे आश्वासन

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळसूत्राचा उल्लेख केल्यानंतर राजकीय वादाला तोड फुटले आहे. त्यांच्या याबाबतच्या विधानावरून विरोधकांनी टीका केली. तर जनतेतूनही या वक्तव्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. विविध राजकीय पक्षांनी आरोग्य, संपत्ती आणि ‘मंगळसूत्र’ यावर जास्त भर दिला आहे. आता काँग्रेसने जाहीर केले आहे की, त्यांचे सरकार आल्यास प्रत्येक भारतीयाला 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील आणि कोणत्याही महिलेला तिच्या कुटुंबाच्या उपचारासाठी तिचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागणार नाही, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे.

प्रत्येक भारतीयाला 25 लाखांपर्यंतचे मोफत उपचार देऊ. कोणत्याही भारतीय महिलेला तिच्या कुटुंबाच्या उपचारासाठी तिचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर निवडणूक आश्वासने शेअर केली आहेत. महागाई आणि बेरोजगारीच्या शिखरावर असलेल्या भारतात आज दरवर्षी 6 कोटींहून अधिक लोकांना मेडिकल बिल गरिबीत ढकलत आहे. महागडे उपचार, महागड्या चाचण्या आणि महागडी औषधे यामुळे सर्वसामान्य माणूस कर्जबाजारी होतो आणि व्याजाच्या चक्रात अडकतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक वर्षे जातात. त्यामुळे आम्ही प्रत्येक भारतीयाला 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार देऊन असुरक्षिततेच्या या चक्रातून बाहेर काढू, असा आमचा संकल्प आहे. आता भारतातील कोणत्याही महिलेला तिच्या कुटुंबाच्या उपचारांसाठी तिचे मंगळसूत्र गहाण ठेवावे लागणार नाही, असेही राहुल गांधी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.