इराकमध्ये समलैंगिक संबंध ठेवणाऱयांना 15 वर्षांची शिक्षा

इराकच्या संसदेत समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारे विधेयक मंजूर करण्यात आले. बीबीसी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले असून इराकमध्ये आता समलैंगिक संबंध ठेवणाऱयांना 10 ते 15 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.

या नव्या कायद्यांतर्गत ट्रान्सजेंडर लोकांनाही तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. देशातील धार्मिक भावनांचे संरक्षण करण्यासाठी समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरवणारा कायदा करण्यात आल्याचे संसदेने म्हटले आहे. इतकेच नाही तर समलैंगिकता किंवा वेश्यावृत्तीला प्रोत्साहन देणारे लोक आणि लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया करणाऱया डॉक्टरांनाही तुरुंगात टाकले जाणार आहे. याशिवाय जाणूनबुजून महिलांसारखे वागणाऱया पुरुषांना आणि पत्नीच्या अदला-बदलीमध्ये सहभागी लोकांनाही नव्या कायद्यांतर्गत तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

समलैंगिक संबंधांना प्रोत्साहन देणाऱयांना सात वर्षांच्या तुरुंगवासाची तरतूद करण्यात आली आहे. इराकच्या संसदेत मंजूर करण्यात आलेल्या नव्या कायद्याला अमेरिका आणि युरोपियन युनियनने कडाडून विरोध केला आहे. हा कायदा म्हणजे मानवी मूल्यांचे हहन असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.