पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या फरार आरोपीला गुजरातच्या एटीएसकडून अटक

गुजरातच्या एटीएसला मोठं यश मिळाले आहे. एटीएसने पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या मोहम्मद सकलेन याला अटक केली आहे.  या प्रकरणाचा गुजरातच्या एटीएसने ऑक्टोबरमध्ये पर्दाफाश केला होता आणि आरोपी पकडले होते. मात्र त्या आरोपींपैकी मोहम्मद सकलेन हा फरार होता त्याला रविवारी अटक करण्यात आली.

गुजरातच्या जामनगर येथे राहणारा मोहम्मद सकलेन याने हिंदुस्थानी नंबरचे सीम कार्ड खरेदी करुन व्हॉट्सअॅप अॅक्टिवेट केले. हे व्हॉट्सअॅप पाकिस्तानातून ऑपरेट होत होते आणि त्या व्हॉट्सअॅप नंबरवरुन जम्मू काश्मीरमध्ये सैन्याची हेरगिरी केली जात होती. मात्र मालवेअर पाठवून हिंदुस्थानी लष्कराच्या जवानांच्या मोबाईलवर हेरगिरी करण्याचा पाकिस्तानचा कट गुजरात एटीएसने उलथून लावला आहे.

गुजरात एटीएसला मिलिटरी इंटेलिजन्सकडून माहिती मिळाली होती की, एका पाकिस्तानी एजन्सीचा गुप्तहेर हिंदुस्थानी सेवेतील कर्मचाऱ्यांचा फोन डेटा हॅक करून त्यांच्या फोनवर संशयास्पद लिंक्स (व्हायरस) पाठवून हिंदुस्थानी सैन्याची गुप्त माहिती लीक करत आहे. या माहितीनंतर गुजरात एटीएसने त्या क्रमांकाचा शोध घेतला. त्यावेळी कळले की, तो क्रमांक जामनगर येथील मोहम्मद सकलेन याच्या नावावर होता. त्याने हे सिमकार्ड जामनगरच्या असगरला दिले होते आणि पाकिस्तान दूतावासात काम करणाऱ्या एका व्यक्तीने हे सिमकार्ड गुजरातमधील आणंद जिल्ह्यातील तारापूर येथील रहिवासी लाभशंकर माहेश्वरी यांना दिले होते. लाभशंकर माहेश्वरी पाकिस्तानात राहत होता. 1999 मध्ये तो व्हिसाच्या आधारे हिंदुस्थानात आला होता.

2005 मध्ये लाभशंकर आणि त्याच्या पत्नीने हिंदुस्थानी नागरिकत्व मिळवले होते. यानंतर लाभशंकरने 2022 मध्ये पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज केला होता. पण व्हिसा मिळण्यास उशीर होत होता, त्यामुळे त्यांनी पाकिस्तानमध्ये राहणाऱ्या त्यांच्या मावशीचा मुलगा किशोर रामवाणी यांच्याशी बोलले. किशोरने लाभशंकर यांना पाकिस्तान दूतावासातील कोणाशी तरी व्हॉट्सॲपवर बोलण्यास सांगितले होते. यानंतर लाभशंकर आणि त्यांच्या पत्नीचा व्हिसा मंजूर होऊन दोघेही पाकिस्तानात गेले. नंतर, तिने पुन्हा या व्यक्तीशी तिची बहीण आणि तिच्या मुलीच्या पाकिस्तानी व्हिसासाठी पाकिस्तान दूतावासात संपर्क साधला आणि त्याला मान्यता मिळवून दिली होती.