दादर येथे 22 व 23 फेब्रुवारी रोजी ग्रंथोत्सवाचे आयोजन, सर्वांना विनामूल्य प्रवेश

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय मुंबई शहर व मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दादर पूर्व यांच्या संयुक्त विद्यमाने 22 व 23 फेब्रुवारी 2024 रोजी मुंबई शहर ग्रंथोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा ग्रंथोत्सव मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय, 3 रा. मजला, शारदा मंगल कार्यालय, 172, नायगाव, दादर (पूर्व) येथे होणार असून सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष लेखक, कवी, समीक्षक, संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे ग्रंथोत्सवाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता या ग्रंथोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल

ग्रंथोत्सवामधील कार्यक्रम-

गुरूवार दि. 22 फेब्रुवारी 2024 रोजी सकाळी 9.30 वाजता ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. ग्रंथ दिंडीचा मार्ग : मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, नायगाव, दादर (पू.) मनपा अग्निशमन केंद्र, दादर- रणजित बुधकर चौक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग – निरंकारी बाबा हरदेव सिंहजी महाराज चौक – – एस.एस. वाघ मार्ग-महात्मा गांधी चौक- महात्मा फुले रोड – शाहीर मधु कडू चौक – कार्यक्रम स्थळापर्यंत आहे. त्यानंतर सकाळी 10.30 वाजता ग्रंथोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संजय यादव, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उप सचिव प्रताप लुबाळ उपस्थित राहणार आहेत.

शुक्रवार दि.23 फेब्रुवारी 2024 सकाळी. 10.30 वाजता मराठीतील दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शनाचे भाषा संचालनालयाच्या भाषा संचालक विजया डोनीकर यांच्या हस्ते उद्घाटन. स. 11 वाजता माझे वाचन या विषयावर डॉ. नरेंद्र जाधव (अर्थतज्ञ, लेखक, शिक्षण तज्ञ, माजी राज्यसभा सदस्य, माजी कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व माजी मुख्य आर्थिक सल्लागार, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई) व्याख्यान दु. 12.30 ते 2 वसा वाचनसंस्कृतीचा सहभाग या विषयावर परिसंवाद ( सहभाग डॉ. नंदकिशोर मोतेवार विभाग प्रमुख, ग्रंथालय व माहितीशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ, मुंबई) श्री. किरण येले (साहित्यिक, मुंबई) श्री. अशोक मुळे (डिंपल प्रकाशन, मुंबई) डॉ. दीपक पाटील (वाचक व ग्रंथप्रेमी, मुंबई)

दु. 2.30 ते 4 वाजता ओंकार साधना, मुंबई निर्मित “कुटुंब रंगले काव्यात” एकपात्री काव्यनाट्यानुभव (सादरकर्ते : श्री. विसुभाऊ बापट, मुंबई) दु. 4 ते 5 या वेळात सह्याद्री वाहिनी कार्यक्रम वृत्त निवेदिका दीपाली केळकर या “हास्यसंजीवनी” हास्य व विनोदाचे महत्त्व, साहित्यातील विनोदाचे विविध प्रकार, मान्यवरांचे किस्से, विडंबन, वात्रटिका, संत साहित्यातील विनोद यांनी सजलेला कार्यक्रम सादर करतील. सायं. 5.30वाजता ग्रंथालयातील महत्त्वपूर्ण घटकांचा प्रातिनिधीक गौरव व ग्रंथोत्सव समारोप. या समारंभास एस.एन.डी.टी. विद्यापीठ, मुंबईच्या ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागाचे विभाग डॉ. सुभाष चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.