शेअर बाजारासाठी अमंगल मंगळवार; मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

शेअर बाजारासाठी मंगळवार अमंगल ठरला आहे. मंगळवारी बाजाराची सुरुवात होताच बाजारात मोठ्या घसरणीला सुरुवात झाली. प्रि ओपन मार्केटमध्येही घसरण दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत 11.30 वाजेपर्यंत 562 अंकांची घसरण झाली होती. तर राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकांत 192 अंकांची घसरण दिसून आली. बाजारात अचानक विक्री वाढल्याने शेअरचे भाव घसरले आहेत. या घरसणीचा सर्वाधिक फटका टाटा समुहाच्या शेअर्सला बसला आहे.

राष्ट्रीय शेअर बाजार म्हणजे निफ्टी 21900 अंकांच्या खाली गेल्याने गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून बाजार तेजीत होता. सोमवारीही चढउतारानंतर थोडीशी तेजी दाखवत बाजार बंद झाला होता. मात्र, आता निफ्टीसाठी महत्त्वाचा असणारा 21900 चा अकांखाली निर्देशांक गेला आहे. निफ्टी 50 मध्ये 42 शेअरमध्ये विक्री वाढली. तर फक्त 8 शेअरमध्ये थोडी तेजी होती.

मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकांत 620 अंकांपर्यत घसरण झाली आहे. हा निर्देशांक 72,118 वर आला आहे . तर निफ्टीचा निर्देशांकात 212 अंकांची घट होत तो 21843 पर्यंत खाली आला आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. बाजारातील या घसरणीचा फटटा टाटा समुहाच्या शेअरला बसला आहे. टीसीएसच्या शेअरमध्ये मोठी घसरण दिसून आली. तसेच सिप्ला, बीपीसीएल, डॉ. रेड्डी, नेस्ले इंडिया यांच्या शेअरमध्येही घसरण झाली. बाजारात आगामी काही दिवस चढउतार राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व बँकेच्या धोरणाची गुंतवणूकदार वाट बघत आहेत. त्यामुळे अनेक गुंतवणूकदार बाजारातून पैसे काढून घेत असल्याने बाजारात घसरण होत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. 20 मार्चला फेडरल रिझर्व बँकेचे धोरण जाहीर झाल्यावर बाजाराला दिशा मिळेल, असेही तज्ज्ञांनी सांगितले.

टीसीएसमुळे गुंतवणूकदारांचे 45 हजार कोटी बुडाले

टीसीएसच्या शेअरमध्ये 3.21 टक्क्यांची घसरण होत हा शेअर 4019 रुपयांवर आला आहे. टाटा सन्स टीसीएसमधील आपली भागीदारी कमी करणार असल्याचे वृत्त असल्याने टीसीएसच्या एअरमध्ये मोठी घसरण झाली. या मोठ्या घसरणीमुळे गुंतवणीकदारांचे या एका शेअरमध्ये 45 हजार कोटींचे नुकसान झाले. तसेच कंपनीचे मार्केट कॅपही घटले आहे.