गुकेशची ड्रॉनंतर दुसऱया स्थानी घसरण; प्रज्ञानंद, गुजरातीला पराभवाचा धक्का

हिंदुस्थानचा ग्रॅण्डमास्टर डी. गुकेशने 11व्या फेरीत अव्वल मानांकित फॅबियानो कारूऍनाला बरोबरीत रोखण्याचा पराक्रम केला. मात्र, या बरोबरीमुळे त्याची अव्वल स्थानावरून संयुक्तपणे दुसऱया स्थानावर घसरण झाली. दुसरीकडे आर. प्रज्ञानंद व विदीत गुजराती या हिंदुस्थानी खेळाडूंना पराभवाचा धक्का बसला.

प्रज्ञानंदला अमेरिकेच्या हिकारू नाकामूराने, तर गुजरातीला रशियाच्या इयान नेपोम्नियाश्चि याने हरविले. इतर लढतींत फ्रान्सच्या फिरोजा अलीरजाने अझरबैजानच्या निजात अबासोवचा पराभव केला. स्पर्धेच्या आता केवळ तीन फेऱया शिल्लक असून इयान नेपोम्नियाश्चि याला जेतेपदाच्या हॅटट्रिकचा दावेदार मानले जात आहे.

रशियावर बंदी असल्याने इयान नेपोम्नियाश्चि हा फिडेच्या ध्वजाखाली खेळत आहे. 11 फेर्यात सर्वाधिक 7 गुणांची कमाई करीत तो गुणतालिकेत ‘नंबर वन’च्या सिंहासनावर विराजमान आहे.  गुकेश, कारूऍना व नाकामुरा हे 6.5 गुणांसह संयुक्तपणे दुसऱया स्थानी आहेत. प्रज्ञानंद व गुजराती यांच्या खात्यात प्रत्येकी 5 गुण आहेत.

महिला गटात चीनच्या झोंग्यी तान एकेरी आघाडीवर कायम असून तिचीच देशसहकारी टी. लेई दुसऱया स्थानावर आहे. हिंदुस्थानच्या आर. वैशालीने अव्वल मानांकित रशियाच्या अलेक्झांडर गोरियाश्किनावर सनसनाटी विजय मिळविला. याचबरोबर कोनेरू हम्पी हिनेही बुल्गारियाच्या नूरगुल सलीमोवाचा पराभव केला.