कोरोना होऊन गेलेल्यांनी अतिमेहनत टाळा, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचा सल्ला

हिंदुस्थानात कमी वयात हृदयविकाराचा झटका येण्याचं प्रमाण वाढलं आहे. कोरोना महामारीच्या संक्रमणानंतर अशा घटनांमध्ये वाढ झाल्याने याचा कोरोनाशी संबंध असावा का, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. त्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी उत्तर दिलं आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी अशा तीव्र हृदयविकाराच्या झटक्यांचं कारण आणि उपाय सांगितले आहेत. रविवारी भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेत एका अहवालाचा संदर्भ देत मांडविया यांनी याची माहिती दिली. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, ज्यांना कोरोनाची लागण होऊन गेली आहे, त्यांनी त्याच्या दोन वर्षंतरी अधिक शारीरिक मेहनत करू नये.

गुजरात राज्यात काही दिवसांपूर्वीच गरबा खेळताना अनेक तरुणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल या यांनी तज्ज्ञांची बैठक बोलवून या मागील कारणांचा आढावा घ्यायला सांगितला होता. या प्रकरणी झालेल्या तपशीलवार अभ्यास असं आढळून आलं आहे की, जे लोक कोविड 19 ने संक्रमित झाले होते, त्यांनी अति अंगमेहन टाळायला हवी. जवळपास दोन वर्षं तरी त्यांनी विशेष अंगमेहनत करू नये. अगदी अधिकचा व्यायाम आणि धावण्यापासूनही दूर राहावं, जेणेकरून हृदयविकाराचा झटका येऊ नये. ही माहिती मांडविया यांनी माध्यम प्रतिनिधींसमोर उघड केली आहे.